लातूरात सहकारी संस्थेत दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:33 IST2021-06-14T20:32:48+5:302021-06-14T20:33:16+5:30
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन आणि सचिवांनी संगनमत करून १ कोटी ६५ लाख ५७ हजार १८८ रुपयांची अफरातफर केल्याच्या अहवालावरून रेणापूर पोलीस ठाण्यात रविवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरात सहकारी संस्थेत दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल
पानगाव (जि. लातूर) : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन आणि सचिवांनी संगनमत करून १ कोटी ६५ लाख ५७ हजार १८८ रुपयांची अफरातफर केल्याच्या अहवालावरून रेणापूर पोलीस ठाण्यात रविवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन दिलीपराव आगळे व सचिव श्रीकांत आगळे यांनी संगनमत केले. २ फेब्रुवारी १९९४ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत त्यांनी शासनाची फसवणूक करीत संस्थेच्या नावे जागा खरेदी, इमारत बांधकाम, बोअर खर्च, प्रवास खर्च, लाईटबिल, वॉचमन पगार आदी बाबींवर शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाकडून मिळालेल्या कर्ज, भागभांडवलाची व सभासदांकडून जमा केलेली भागभांडवलाची एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार १८८ रुपयांची बनावट कीर्द व कागदपत्र तयार केले. ते खरे आहेत, असे भासविल्याचे विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालात नमूद करण्यात आले. त्यावरून विशेष लेखापरीक्षक बापूराव वाळके यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि माचेवाड करीत आहेत.