बँकेत चोरट्यांनी मारला डल्ला, तिजोरी कटरने कट करून लाखो रुपये केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 19:01 IST2022-01-26T19:00:21+5:302022-01-26T19:01:27+5:30
Robbery Case : बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 1.48 वाजता दोघे जण बँकेत शिरले असल्याचे दिसून आले आहेत.

बँकेत चोरट्यांनी मारला डल्ला, तिजोरी कटरने कट करून लाखो रुपये केले लंपास
सूर्यकांत बाळापुरे
किल्लारी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील किल्लारी येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची तिजोरी कटरने कट करून 12 लाख 11 हजार 949 रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, सहायक पोलिस निरीक्षक शेख, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक बहुरे यांच्यासह पथकाने भेट देत पाहणी केली. दरम्यान, श्वान पथक, फिंगरप्रिंट पथकानेही तात्काळ भेट देत तपासाची प्रक्रीया सुरू केली.
बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 1.48 वाजता दोघे जण बँकेत शिरले असल्याचे दिसून आले आहेत. दरम्यान, किल्लारी पोलीस स्टेशनला मॅनेजर प्रकाश कुलकर्णी याचा फिर्यादीनुसार अज्ञात दोन अरोपी विरुद्ध कलम457, 380, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पूढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.
सुरक्षा रक्षकाचा निष्काळजीपणा...
बँकेत चोरांनी प्रवेश केल्यावर सायरन दोनदा वाजले. मात्र, तिजोरी असलेल्या खोलीत मांजर शिरले असेल म्हणून सायरन वाजत असेल, असे वाटल्याने सुरक्षा रक्षकाने दुर्लक्ष केले. दरम्यान, बँकेच्या मॅनेजर यांनाही मोबाईलवर संदेश आला होता. मात्र, त्यांनाही मांजराचा संशय आल्याने त्यांनी संदेशाकडे दुर्लक्ष केले. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चोरटे रोकड लंपास करण्यात यशस्वी झाले.