खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:52 IST2025-09-22T11:50:38+5:302025-09-22T11:52:20+5:30
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकाच दिवशी सलग लागोपाठ तीन बँकांवर मोठा दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती.

AI Generated Image
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकाच दिवशी सलग लागोपाठ तीन बँकांवर मोठा दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी देखील तातडीने या प्रकरणाची तपासणी सुरू केली. या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना यश देखील आलं. मात्र, दरोडेखोर कोण होता, हे कळल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी पकडलेला हा दरोडेखोर एक प्रसिद्ध शेफ आहे. त्याच्या हाताने बनवलेल्या इटालियन पदार्थांची चव घेण्यासाठी लोक लांबून येत होते. शहरात प्रसिद्ध शेफची चर्चा झाली की, त्याचे नाव आदराने घेतले जायचे. पण, आता समोर आलेल्या सत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन प्रसिद्ध रेस्टॉरंट चालवणारा हा शेफ बँक लुटारू निघाला. या व्यक्तीने एकाच दिवसात तीन बँकांमध्ये दरोडा टाकला.
कोण आहे हा व्यक्ती?
वेलेंटिनो लूचिन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रसिद्ध इटालियन रेस्टॉरंट 'रोज पिस्टोला'मध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ होता. १० सप्टेंबर रोजी त्याने असे कृत्य केले, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्याने एकाच दिवसात शहरातील तीन बँका लुटल्या.
धमकीचे पत्र देऊन केली चोरी
सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलेंटिनो १० सप्टेंबर रोजी एकामागे एक तीन बँकांमध्ये गेला. त्याने कॅशियरला धमकीचे पत्र दिले आणि भीतीने कॅशियरने त्याला पैशांनी भरलेल्या पिशव्या दिल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती हुडी घालून आणि हातात बंदूक घेऊन बँकेत शिरताना दिसला. विशेष म्हणजे त्याच्या हातात असलेली ही बंदूक खेळण्यातील होती. तपासानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली.
दोन रेस्टॉरंट्स झाली बंद!
वेलेंटिनो आधी 'रोज पिस्टोला' रेस्टॉरंटमध्ये मुख्य शेफ होता, पण २०१७मध्ये ते बंद झाले. त्यानंतर त्याने स्वतःचे एक रेस्टॉरंट सुरू केले, पण त्यालाही ते बंद करावे लागले. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने बँक लुटण्याचा मार्ग निवडला.
स्टार ते कंगाल
इटलीमध्ये जन्मलेल्या वेलेंटिनो १९९३ मध्ये अमेरिकेत आला. बघता बघता तो एक प्रसिद्ध 'सेलिब्रिटी शेफ' बनला. पण त्याचे रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. एका वेळी त्याला स्वतःला दिवाळखोर घोषित करावे लागले होते. त्याच्यावर १,११,००० डॉलरपेक्षा जास्त कर्ज होते आणि त्याच्याकडे फक्त २७,००० डॉलरची मालमत्ता उरली होती.
खेळण्यातील बंदूक वापरली
वेलेंटिनोने पोलिसांना सांगितले की, त्याच्या हातातील बंदूक खरी नसून एक खेळण्यातील पिस्तुल आहे आणि त्याला खरी बंदूक चालवता येत नाही. ही त्याची पहिलीच चोरी नव्हती. २०१८ मध्येही त्याने कॅलिफोर्नियामध्ये एका बँकेतून १८,००० डॉलर चोरले होते. पैशांच्या अडचणीमुळे आपण हे पाऊल उचलल्याचे त्याने म्हटले.