नव्या नवरीचा जुना 'प्रताप'! लग्नाच्या रात्री करते कांड; ६ जणांचं आयुष्य उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 09:03 IST2024-12-22T09:02:32+5:302024-12-22T09:03:47+5:30
छतरपूरच्या कुलवारा गावातील ही घटना आहे. याठिकाणी राहणारे अशोक कुमार रावत यांचा मुलगा राजदीपचं लग्न खुशी नावाच्या मुलीशी झालं.

नव्या नवरीचा जुना 'प्रताप'! लग्नाच्या रात्री करते कांड; ६ जणांचं आयुष्य उद्ध्वस्त
छतरपूर - मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एक गजब प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका नवरीने तिच्या नवऱ्यासोबत जे काही केले त्याने सगळेच हैराण झाले आहेत. लग्नाच्या रात्री नवरीने दुधात नशेचं औषध मिसळून नवऱ्याला दिले त्यानंतर घरातील १२ लाखाचे दागिने घेऊन ती लंपास झाली. सकाळी नवऱ्याला शुद्ध येताच त्याने ही घटना घरच्यांना सांगितली. त्यानंतर नवऱ्याच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. शनिवारी या नवरीसह तिच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
छतरपूरच्या कुलवारा गावातील ही घटना आहे. याठिकाणी राहणारे अशोक कुमार रावत यांचा मुलगा राजदीपचं लग्न खुशी नावाच्या मुलीशी झालं. ११ डिसेंबर २०२४ ला कुलवारा येथील मंदिरात दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर १२ डिसेंबरच्या रात्री नवरीने राजदीपला दुधातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर घरातील १२ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली. या सोने चांदीसह मुलाच्या मोबाइलचाही समावेश होता. नैगुवा येथील सुकन पाठक यांच्या मध्यस्थीने चरखारी येथे राहणाऱ्या खुशीसोबत राजदीपचं लग्न झालं होते. चरखारीत मुलगी आणि तिचं कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत होते अशी माहिती नवऱ्याकडील कुटुंबाला देण्यात आली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यात एक टीम बनवण्यात आली. बारकाईने सगळे धागेदोरे जुळवून पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या साथीदारांना अटक केली. पकडलेल्या आरोपी मुलीचं खरे नाव बिट्टू असं आहे. ती महोबा जिल्ह्यातील लवकुशनगर येथे राहते. तिचा साथीदार अभय सिंह याला हमीरपूर येथे पकडले. आरोपी मुलगी तिच्या साथीदारांसोबत मिळून लुटलेली संपत्ती वाटायची. या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
आईची तब्येत खराब असल्याचा बहाणा
पीडित युवकाने सांगितले की, या मुलीच्या भावांनी आईची तब्येत खराब असल्याचं सांगितले होते. त्यामुळे लग्न लवकर करण्याचा आग्रह धरला. भाऊ बेरोजगार आहेत, आईच्या उपचाराची चिंता आहे. त्यामुळे ११ डिसेंबरला आमचं लग्न झालं. त्यानंतर १२ डिसेंबरच्या रात्री ही मुलगी फरार झाली असं त्याने सांगितले. तर आरोपी मुलीच्या चौकशीत ते लोक नाव बदलून लग्न करत होते. नवरा ब्राह्मण होता म्हणून मुलीने तिच्या नावासमोर तिवारी लावले. त्यात नवरीचा कथित भाऊ छोटू तिवारी, मित्र विनय तिवारी यांचा समावेश होता. दरम्यान, या फसवणुकीत अभय सिंह याला अटक केली असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपी मुलीने ६ हून अधिक तरुणांशी बनावट लग्न करून त्यांना शिकार बनवलं आहे.