निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:04 IST2025-12-20T08:04:19+5:302025-12-20T08:04:32+5:30
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी चितळी (ता. खटाव) येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञाकडून तब्बल १.३९ कोटी उकळले.

निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
सातारा : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी चितळी (ता. खटाव) येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञाकडून तब्बल १.३९ कोटी उकळले. १४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी सातारा सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकांवर गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून, सायबर क्राइम शाखेने ६.३० लाख रुपयांची रक्कम फ्रीज केली आहे. याबाबत मालोजीराव नामदेव पवार (वय ७३) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरबीआयची पत्रे, सुप्रीम कोर्टाचे आदेशही पाठवले
१. १४ नोव्हेंबर रोजी पवार यांना एक फोन आला. तुमचे आधारकार्ड वापरून संदीपकुमार या व्यक्तीने आयसीआयसीआय बँकेत खाते उघडले आहे. त्यावर आठ कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगितले.
२. पवार यांना चार वेगवेगळ्या क्रमांकांवरून व्हिडीओ-ऑडिओ कॉल करून, तसेच व्हॉट्सअॅपवर 'आरबीआय'ची पत्रे व सर्वोच्च न्यायालयीन आदेश पाठवून अटकेची भीती दाखवली. भीतीने पवार यांनी १ कोटी ३९ लाख ५० हजार रुपये पाठवले.
संशयितांनी काढला पवार यांचा ठावठिकाणा
अनोळखी मोबाइलधारकांनी मालोजी पवार यांच्याशी सतत व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत ठावठिकाणाची माहिती घेतली. तसेच, पहिल्या दिवशी झालेले संभाषण कोणालाही सांगितल्यास अटक करण्याची धमकी दिली.
हायकोर्टाचा अधिकारीही बनावट वारंटने चरकला
नागपूर : मुंबई एटीएसमधून बोलत असल्याची बतावणी केली. दिल्लीत बॉम्बस्फोट प्रकरणात काश्मीरमधील काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळील एटीएम कार्ड अधिकाऱ्याशी लिंक असल्याची माहिती समोर आली असून, आता कारवाई करण्यात येईल, अशी भीती उच्च न्यायालयाच्या निवृत्त अधिकाऱ्याला दाखवून ६८ लाख रुपये उकळले. या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.