सांगली : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारक सुमित सुधीर हुपरीकर यास निलंबित करण्यात आले आहे. (Remdesivir Injection: Employees of Miraj Government Hospital suspended in Remdesivir black market case)
रुग्णांसाठी दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर तब्बल ३० हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यात मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी सुमित सुधीर हुपरीकर (वय ३२, रा. समृद्धीनगर, विश्रामबाग, सांगली) याच्यासह खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञ दाविद सतीश वाघमारे (वय २५, रा. कुपवाडरोड, विजयनगर, सांगली) यांचा समावेश होता.
रविवार दि. २५ रोजी सकाळी संशयित दोघेही रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विलिंग्डन महाविद्यालयासमोर थांबले होते. याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले व तपासणी केली असता, त्यांच्याजवळ रेमडेसिविरची एक कुपी आढळून आली.
यावेळी त्यांनी एक इंजेक्शन यापूर्वी आम्ही ३० हजार रुपयांना विकले असून, हेही इंजेक्शन ३० हजार रुपयांना विकणार होतो, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा सुमित हुपरीकर यास निलंबित करण्यात आले आहे.