आकुर्डीतून 35 लाखांसाठी अपहरण झालेल्या मॅनेजरची सुटका; पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 02:51 IST2020-10-14T02:51:18+5:302020-10-14T02:51:36+5:30
तीन वाहनांसह सात मोबाइल जप्त, खंडणीचे पैसे स्वीकारण्यासाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आकुर्डीतून 35 लाखांसाठी अपहरण झालेल्या मॅनेजरची सुटका; पाच आरोपींना अटक
पिंपरी : गुंतवणुकीसाठी पैसे घेण्यासाठी मुंबई येथून आलेल्या व्यापा-याच्या मॅनेजरचे आकुर्डी येथून शनिवारी (दि. 10) अपहरण झाले. अपरहरणकर्त्यांनी 35 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तसेच आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने व सात मोबाइल फोन असा 61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायातून वाद होऊन हा अपहरणाचा प्रकार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
राहूल तिवारी (वय 27, सध्या रा. आकुर्डी) असे सुटका झालेल्या अपह्रत मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमार मनोहरसिंग (वय 43, रा. कांदिवली, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. 13) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमर कदम, शशांक कदम आणि हरिश राजवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
फिर्यादी हे मॅनेजर राहूल तिवारी यांच्यासह कामानिमित्त आकुर्डी येथे आले. काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणुकीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी मॅनेजर राहूल गेला. त्यांचा शनिवारी फिर्यादी राजकुमार यांना फोन आला. मी पाच लाख रुपये आणले आहेत, मात्र मला वाचवा, असे म्हणून त्यांनी फोन कट केला. राजकुमार यांनी राहूल यांच्या मोबाइलवर फोन केला असता तो राजकुमार यांच्या ओळखीच्या आरोपी अमर कदम याने उचलला. राहूलला सोडायचे असेल तर 35 लाख रुपये द्या, असे म्हणत खंडणी मागितली. त्यानंतर राजकुमार यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
खंडणीचे पैसे स्वीकारण्यासाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आशुतोष अशोक कदम (वय 28, रा. रहाटणी), राहुल बसवराज माळगे (वय 22, रा. काळेवाडी), हरिश्चंसद्र बारकू राजीवाडे (वय 40, रा. बापदेवनगर, किवळे), शशांक जगन्नाथ कदम (वय 39, रा. मोरवाडी, पिंपरी), तुळशीराम नथुराम पोकळे (वय 34, रा. नढेनगर, काळेवाडी) अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अपह्रताला चारचाकी वाहनातून फिरवले दिवसभर
आरोपी यांनी राहूल तिवारी यांचे अपहरण करून त्यांच्याकडील पाच लाख रुपये काढून घेऊन त्यांना चारचाकी वाहनातून दिवसभर फिरवले. दुस-या दिवशी गहुंजे येथे बिल्डिंगमध्ये रात्रभर डांबून बेल्टने मारहाण केली. दरम्यान, तुळशीराम नथुराम पोकळे, अमर अशोक कदम, विकी गरुड, उमेश मोरे यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपी यांनी अपह्रत राहुल तिवारी यांना सोडून दिले.