बलात्कारपीडित दलित मुलीला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 01:33 IST2020-11-19T01:33:05+5:302020-11-19T01:33:45+5:30

crime news: उत्तरप्रदेशातील घटना; तीन जणांना अटक

Rape victim Dalit girl burnt alive | बलात्कारपीडित दलित मुलीला जिवंत जाळले

बलात्कारपीडित दलित मुलीला जिवंत जाळले

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर येथील एका १५ वर्षे वयाच्या दलित मुलीला जिवंत जाळल्याची भीषण घटना घडली. गंभीररीत्या भाजलेली ही  मुलगी दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मरण पावली. या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार यापूर्वी पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या जळीतप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.


या मुलीच्या घरात सात जण शिरले व तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले, अशी तक्रार आता पोलिसांत दाखल झाली आहे. या मुलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला आहे. 
त्यात ती म्हणते की, ज्यांनी यापूर्वी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला तेच लोक आज आमच्या घरात शिरले होते.


बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोषकुमार सिंह यांनी सांगितले की, एका व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार या मुलीने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे दाखल केली होती. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक झाली आहे. बलात्कारपीडित मुलीला जिवंत जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सातपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. (वृत्तसंस्था) 


तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मागे घेतली नाही म्हणून आरोपीशी संबंधित लोकांनी या मुलीलाच जिवंत जाळण्याचे भीषण कृत्य केले असा दावा बलात्कारपीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

Web Title: Rape victim Dalit girl burnt alive