कल्याणमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा
By पंकज पाटील | Updated: September 27, 2022 19:37 IST2022-09-27T19:36:40+5:302022-09-27T19:37:19+5:30
उल्हासनगर जवळील मानेरा गाव परिसरात राहणाऱ्या महेंद्र वसंत भोईर या तरुणाच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा
बदलापूर - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा बदलापुरात दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून या तरुणाने पिढीतेवर पाच वेळा बलात्कार केला आहे. लग्न न केल्याने तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर हा प्रकार उघड झाला.
उल्हासनगर जवळील मानेरा गाव परिसरात राहणाऱ्या महेंद्र वसंत भोईर या तरुणाच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 सप्टेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मानेरा गाव परिसरात राहणाऱ्या महेंद्र भोईर याचे एका बदलापूरमधील तरुणीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. या संबंधातून त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्याच मैत्रीचा फायदा उचलत महेंद्र याने एप्रिल 2022 मध्ये सदर पीडित तरुणीवर अंबरनाथ एमआयडीसी परिसरात कार मध्येच तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराला तिने विरोध केल्यानंतर महेंद्रने तिच्या सोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. या प्रकारानंतर पुन्हा मे महिन्यात दुसऱ्यांदा, ऑगस्ट महिन्यात तिसऱ्यांदा आणि सप्टेंबर महिन्यात चौथ्यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
महेंद्रने तिच्याशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकाराची माहिती संबंधित पीडित तरुणीने महेंद्र याचे वडील वसंत भोईर यांना 20 सप्टेंबर रोजी दिली. त्यानंतरही महेंद्रने 24 सप्टेंबर रोजी पीडित तरुणीवर पुन्हा बलात्कार केला. मात्र महेंद्र आपली फसवणूक करीत असल्याची बाब लक्षात येताच त्या तरुणीने विषारी औषध पिऊन महेंद्र यांच्या गाडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार महेंद्रच्या लक्षात येताच त्याने तिला रुग्णालयात न नेता थेट तिच्या घरी नेऊन सोडले. अखेर संबंधित तरुणीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून महेंद्र भोईर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.