"माझ्या लग्नाला यायचं हा...", PDF कार्ड उघडताच बँक अकाऊंट झालं खाली, ७५ हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:46 IST2025-02-22T17:45:29+5:302025-02-22T17:46:34+5:30
लग्नाचं आमंत्रण एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.

"माझ्या लग्नाला यायचं हा...", PDF कार्ड उघडताच बँक अकाऊंट झालं खाली, ७५ हजारांचा गंडा
सोशल मीडियावरच हल्ली लग्नाचं, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं आमंत्रण एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. त्याला हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील अनेक लोकांसोबतही असंच घडल्याचं आता समोर आलं आहे.
राजकोटच्या कोलीथड गावातील रियाज भाई गाला यांच्यासोबत भयंकर प्रकार घडला. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना त्यांचे नातेवाईक ईशान भाईकडून फोनवर एक मेसेज आला - "माझ्या लग्नाला नक्की यायचं हा..." असा मेसेज होता. त्यासोबत एक पीडीएफ फाइलही होती. रियाज भाई आनंदी झाले, त्यांनी विचार केला की लग्नाची पत्रिका पाहूया, पण हे कार्ड प्रत्यक्षात सायबर गुन्हेगारांनी रचलेला सापळा होता.
रियाज यांनी फाइल डाउनलोड करताच त्यांच्या फोनचा कंट्रोल हॅकर्सच्या हातात गेला. सुरुवातीला फक्त १ रुपया कापला गेला, नंतर हळूहळू संपूर्ण ७५,००० रुपये गायब झाले. रियाज यांना काही समजेपर्यंत त्यांच्या कष्टाचे सर्व पैसे दुसऱ्याच्या खिशात गेले होते.
रियाज भाई एकटे नव्हते. कोलीथड गावातील शेतकरी शैलेश भाई सावल्या यांच्या बाबतीतही असंच धक्कादायक घडलं आहे. दिवसभर शेतात कष्ट करणाऱ्या शैलेश भाईंनाही असंच एका लग्नाचं आमंत्रण मिळालं. त्यांनी फाइल डाउनलोड केली आणि काही वेळातच त्यांच्या खात्यातून २४,००० रुपये गायब झाले. या घटनांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.