rajasthan-university-women-teacher-sexual-harassment-phone-call-rape-threat | खळबळजनक! फोनवरुन बलात्काराची धमकी, तब्बल 65 महिला शिक्षकांची पोलिसात तक्रार
खळबळजनक! फोनवरुन बलात्काराची धमकी, तब्बल 65 महिला शिक्षकांची पोलिसात तक्रार

ठळक मुद्देमहेश नगर आणि गांधी नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.अज्ञात आरोपी इंटरनेटद्वारे एका विशेष सॉफ्टवेअरने फोन करत असून तो फोन नंबर ट्रेस केला जात नाही आहे.

राजस्थान - राजस्थान विश्वविद्यालयातील ६५ महिला शिक्षकांनी लैंगिक छळाची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या महिला शिक्षकांचा आरोप आहे की कोणी अज्ञात व्यक्ती त्यांना सतत फोन करून बलात्काराची धमकी देत अश्लील बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या पाठलाग देखील केला जात आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या नाकी दम आलाय तर परिसरात खळबळ माजली आहे. 

राजस्थान युनिव्हर्सिटीतीळ महिला प्रोफेसर घाबरलेल्या आहेत. काहींनी तर युनिव्हर्सिटीत येणं देखील बंद केलं आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सकाळ असो की दिवस - रात्र केव्हाही मोबाईलवर फोन येतो आणि त्यावर अश्लील बोललं जात आहे. अश्लील बोलणाऱ्यास टोकलं असता समोरून फोनद्वारे बलात्कार करण्याची धमकी दिली जाते. सोमवारी तर या नराधमांनी हद्दच पार केली आणि काही महिला प्रोफेसर यांच्या घरी कॅश ऑन डिलेव्हरीने भेटवस्तू पाठविणे आणि सोबत बलात्काराची धमकी देखील पाठवू लागले. राजस्थान युनिव्हर्सिटीने या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरील सर्व महिला प्रोफेसर यांचे फोटो, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि अन्य माहिती डिलीट केली आहे. जयपूरमधील मुलींसाठी असलेल्या सर्वात मोठ्या महाराणी कॉलेजच्या प्रिंसिपलचे म्हणणे आहे की, पीडित महिला प्रोफेसरांनी संख्या जवळपास १५० आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे. महाराणी कॉलेजच्या शिक्षिका सुद्धा खूप घाबरलेल्या परिस्थितीत आहेत. राजस्थान युनिव्हर्सिटीत ३५ विभागांत २३० महिला प्रोफेसर आहेत. त्यापैकी जवळपास १५० जणांनी युनिव्हर्सिटी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. महेश नगर आणि गांधी नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जयपूर पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी अज्ञात आरोपी इंटरनेटद्वारे एका विशेष सॉफ्टवेअरने फोन करत असून तो फोन नंबर ट्रेस केला जात नाही आहे. मात्र, आयटी तज्ञ याप्रकरणी माहिती गोळा करत असल्याचे माहिती दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील कॉलेजच्या प्रवेशद्वारापाशी लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी  + 1226 793 577, + 92310 773 052, + 1052 428 332,+ 1313 497 930 या क्रमांकाहून फोन आल्यास तो रिसिव्ह न करता पोलिसांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. 


Web Title: rajasthan-university-women-teacher-sexual-harassment-phone-call-rape-threat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.