Rajasthan Crime: राजस्थानच्या जयपूरमधल्या एका हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. जयपूरच्या राजसमंदमध्ये गेल्या महिन्यात एका व्यक्तीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तीच्या या हत्येची सूत्रधार मृताची पत्नी असल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं. पत्नीने शाळेतील प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृणपणे हत्या केली. पत्नीने यासाठी फक्त प्लॅनच आखला नाही तर पतीची सगळी माहिती, पैसे देखील आरोपीला पुरवले.
२४ जून रोजी दुपारी १ वाजता भिलवाडा रस्त्यावरील कांक्रोलीपासून काही अंतरावर असलेल्या प्रतापपुरा कल्व्हर्टजवळ रक्ताने माखलेला एक मृतदेह आढळून आला होता. तपासानंतर मृताचे नाव शेर सिंह (३५) असल्याचे समोर आलं. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि घटनास्थळाजवळून त्याची दुचाकी ताब्यात घेऊन तपास सुरु केला होता. तपासादरम्यान, आधी शेर सिंहच्या दुचाकीला एका कारने धडक दिली. त्यानंतर तो खाली पडला. त्यावेळी गाडीमधल्या व्यक्तीने कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी क्रूरपणे शेर सिंहच्या मानेवर वार करत शीर धडावेगळं केलं होतं.
तपासादरम्यान पोलिसांना शेर सिंहच्या पत्नीवर संशय आला. सखोल तपास केला असता या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधार शेर सिंगची पत्नी प्रमोद कंवर (३०) असल्याचे समोर आलं. तिचे शाळेपासूनच राम सिंग (३३) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. प्रमोदने २०१३ मध्ये शेर सिंगशी लग्न केले आणि दोघेही काही काळ चेन्नईमध्ये राहत होते. मात्र २०१८ मध्ये राजस्थानला परतल्यानंतर प्रमोदचे जुने प्रेम तिला पुन्हा भेटले. दोघांनीही शेर सिंहला बाजूला करण्यासाठी कट रचला.
पोलिसांनी या प्रकरणात शेर सिंहची पत्नी प्रमोद कंवर, तिचा प्रियकर राम सिंह यांना अटक करण्यात आली आहे. राम सिंहचे साथीदार शौकीन कुमार भिल (३२) आणि दुर्गा प्रसाद मेघवाल (२५) यांनाही अटक करण्यात आली आहे. दुर्गा प्रसाद आणि शौकीन यांना २५ जून रोजी पकडण्यात आले. त्यानंतर ३० जून रोजी माउंट अबू येथून राम सिंहला पकडण्यात आले. तिघांकडे केलेल्या चौकशीनंतर प्रमोद कंवरला अटक करण्यात आली. दोघेही शाळेपासूनच रिलेशनशिपमध्ये होते. पोलीस चौकशीदरम्यान, प्रमोद कंवरने राम सिंहच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.
दरम्यान, प्रमोदने राम सिंहला तिच्या पतीपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला संपवण्यास सांगितले होते. राम सिंहकडे पैसे नव्हते, म्हणून प्रमोदने त्याला ऑनलाइन २८,००० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर राम सिंहने त्याचे मित्र दुर्गाप्रसाद आणि शौकीन यांना सोबत घेतले आणि हत्येची योजना आखली. त्यानंतर राम सिंहने एक स्पोर्ट कार आणि ६०० रुपयांना कुऱ्हाड विकत घेतली. त्यानंतर प्रमोदने शेर सिंह दुचाकीने बाडमेरला जायला निघाला आहे असं राम सिंहला सांगितले. ती शेर सिंहचे लोकेशन देखील त्याला पाठवत होती. शौकीनने आधी शेर सिंहच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतरही तो वाचला तेव्हा राम सिंहने गाडीतून कुऱ्हाड काढली आणि शेर सिंहवर हल्ला करून त्याची हत्या केली.