राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच सुनेने सासूच्या खिचडीत विषारी पदार्थ मिसळून घरातील दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर नवरदेवासह त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. फरार झालेली नववधू लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीतील सदस्य असल्याचे समजत आहे. सध्या या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा असून, अशा फसव्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमजीत असे फसणवूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी बबली कौर नावाच्या महिलेने विक्रमजीतची ओळख पिंकी कौरशी करून दिली. पिंकीने स्वतःला लग्न जुळवणारी असल्याचे सांगून तिची भाची रेखा कौर हिच्याशी त्याचे लग्न जुळवून देण्याचे ठरवले. विक्रमजीतला कोर्टात बोलावून रेखासोबत लिव्ह-इन रिलेशनशिप करार करण्यात आला. त्यानंतर ६० फूट रोडवरील एका गुरुद्वारात मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले. या लग्नात विक्रमजीतने सुमारे ५ लाख रुपये खर्च केले.
नेमके काय घडले?
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, काही दिवसानंतर रेखाचे वागणे बदलले. ती छोट्या गोष्टींवरून घरात वाद घालू लागली. घटनेच्या दिवशी रेखाने सासूच्या खिचडीत विषारी पदार्थ मिसळला. सासूने खिचडी खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. धक्कादायक बाब म्हणजे, सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा रेखाने घरातील कपाटातील सोन्याचा हार आणि मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने व पैंजण आणि ३० हजार रुपये रोख घेऊन घरातून पळ काढला.
नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली
जेव्हा विक्रमजीतने या प्रकरणाचा स्वतःहून छडा लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोर आलेल्या सत्याने त्याला धक्का बसला. रेखा विवाहित असून तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला नव्हता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुलेही आहे. विक्रमजीतने मध्यस्थी करणाऱ्या पिंकी कौरला जाब विचारला, तेव्हा तिने उद्धट उत्तर दिले. "ज्या लग्नाला मी नवीन सुरुवात मानत होतो, तो केवळ एक बनाव होता. माझ्या कुटुंबाच्या जिवाशी खेळून त्यांनी लाखो रुपयांची लूट केली आहे", अशा शब्दांत विक्रमजीतने आपले दुख: व्यक्त केले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लग्न ठरवताना समोरच्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी, ओळखपत्रे आणि मध्यस्थांची विश्वासार्हता तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
Web Summary : Rajasthan: A newlywed poisoned her mother-in-law's food, stealing jewelry and cash. The groom, Vikramjit, discovered she was part of a scam marriage ring. Police are investigating, urging caution against such fraudulent schemes after the bride fled.
Web Summary : राजस्थान: शादी के एक महीने बाद, एक दुल्हन ने अपनी सास के खाने में जहर मिला दिया और गहने और नकदी चुरा ली। दूल्हे विक्रमजीत को पता चला कि वह एक फ़र्ज़ी शादी गिरोह का हिस्सा थी। पुलिस जाँच कर रही है, और इस तरह की धोखाधड़ी से बचने के लिए सावधानी बरतने का आग्रह किया गया है।