छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजधानी रायपूर येथील दीपक टंडन नावाच्या एका व्यापाऱ्याने महिला DSP कल्पना वर्मावर प्रेमाच्या जाळ्यात फसवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप केला आहे. दीपकच्या आरोपानुसार, गेल्या तीन वर्षांत महिला DSP ने त्याच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये रोख, एक कार, डायमंड रिंग आणि लाखोंचे दागिने हडपले आहेत. एवढंच नव्हे तर महिला DSP आता दीपक टंडनला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठीही जबरदस्ती करत होती.
दीपक टंडनने दिलेल्या माहितीनुसार, एका मित्राच्या माध्यमातून झालेल्या लहानशा भेटीनंतर कल्पना वर्मा वारंवार फोन करून भेटायला येऊ लागली आणि तासन्तास हॉटेलमध्ये बसत असे. एवढेच नाही तर महिला DSP रात्री उशिरा दीपकला व्हिडीओ कॉल करून तासन्तास गप्पा मारायची. कल्पनाने हळूहळू दीपकशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. ती वारंवार कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याच्याकडे पैसे आणि ज्वेलरीची मागणी करू लागली. महिला DSP च्या प्रेमात वेडा झालेला दीपकही तिची प्रत्येक मागणी पूर्ण करत होता.
महिला DSP कल्पना वर्मा २०१७ च्या बॅचची अधिकारी आहे. या काळात रायपूरसह तिची जिथे जिथे पोस्टिंग झाली, तिथून ती दीपक टंडनला भेटण्यासाठी सतत येत राहिली. या भेटीदरम्यान DSP ने दीपकला आपल्या जाळ्यात पूर्णपणे फसवलं होतं. व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महिला DSP ने आपल्या भावाला हॉटेल उघडून देण्याच्या नावाखालीही दीपककडून कोट्यवधी रुपये हडपले होते. सोबतच ती दीपकवर त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी सतत दबाव टाकू लागली. DSP आणि दीपक यांच्या व्हॉट्सएप चॅटमध्येही या सर्व गोष्टींची नोंद आहे.
जेव्हा व्यापाऱ्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यास नकार दिला आणि आपले पैसे व सर्व वस्तू परत मागितल्या, तेव्हा महिला DSP च्या चेहऱ्यावरून प्रेमाचा मुखवटा गळून पडला आणि तिने व्यापाऱ्याला आपल्या वर्दीचा धाक दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. दीपकचा आरोप आहे की, DSP चे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध आहेत, ज्यामुळे कल्पना वर्मा अजूनही त्याला सतत धमकावत आहे.