"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 09:39 IST2025-07-12T09:38:24+5:302025-07-12T09:39:45+5:30
राधिका यादव हत्याकांडात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण मिळालं आहे.

"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
गुरुग्राममध्ये गाजलेल्या राधिका यादव हत्याकांडात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण मिळालं आहे. राधिकाच्या एका शेजाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केलेल्या खुलाशानुसार, राधिकाच्या हत्येमागे जातीभेद आणि ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रेमसंबंध आणि जातीभेदातून आलेला दुरावा
शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय राधिका ही अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. ती एका मुलावर खूप प्रेम करत होती आणि त्याच्याशी लग्न करण्याची तिची तीव्र इच्छा होती. मात्र, तो मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने राधिकाचे वडील, दीपक यादव, यांना हे लग्न पूर्णपणे नामंजूर होते. दीपक यांची इच्छा होती की राधिकाचे लग्न त्यांच्याच जातीत व्हावे. शेजाऱ्याने पुढे सांगितले की, "दीपक खूप जुन्या विचारांचा होता. त्यामुळेच यावरून झालेल्या वादामुळे त्याने राधिकाची हत्या केली असावी. टेनिस अकादमीचा वाद केवळ एक बहाणा असू शकतो."
लोकांच्या टोमण्यांना कंटाळलो होतो!
दीपक यादवने पोलिसांना दिलेल्या कबूलनाम्यात मात्र वेगळीच बाजू मांडली आहे. त्याने सांगितले की, लोकांच्या सातत्याने मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना कंटाळून त्याने हे पाऊल उचलले. "लोक मला टोमणे मारायचे की, मी मुलीच्या पैशांवर जगतोय," असे दीपकने पोलिसांना सांगितले.
राधिकाने काही वर्षांपूर्वी एक टेनिस अकादमी सुरू केली होती आणि त्यातूनच ती पैसे कमावत होती. दीपकला ही अकादमी बंद करायला लावायची होती, परंतु राधिका त्यासाठी तयार नव्हती. ती आपल्या मेहनतीने मिळवलेल्या स्वातंत्र्यावर गदा येऊ देत नव्हती.
दीपकच्या म्हणण्यानुसार, "लोक राधिकाला खूप वाईट बोलायचे. ते म्हणायचे की तुमची मुलगी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावते. हे मला आवडत नव्हते. मी राधिकाला अनेकदा समजावले, पण ती ऐकली नाही आणि त्यामुळे मी तिला मारले."
संशयी स्वभाव आणि मानसिक स्थिती
पोलिसांच्या तपासात दीपक यादवच्या मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासानुसार, दीपकचा स्वभाव अतिशय संशयी होता. तो प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असे आणि रागावत असे. राधिका कोणाशी बोलते, का बोलते, यावर तो सतत प्रश्न विचारत असे. राधिकाने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला की ती काहीही चुकीचे करणार नाही, पण दीपकचा संशय कायम होता.
पोलिसांनुसार, दीपकने कबूल केले आहे की तो गेल्या १५ दिवसांपासून सामाजिक टीकेमुळे डिप्रेशनमध्ये होता. "मुलीच्या कमाई आणि करिअरबद्दलचे टोमणे माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत होते," असे त्याने सांगितले. एका नातेवाईकाने पोलिसांना भेट दिल्यावर सांगितले की, दीपकने लॉकअपमध्ये कबूल केले की त्याने आपल्या मुलीला मारून पाप केले आहे आणि तो रडला.
या प्रकरणात जातीभेदाचा मुद्दा समोर आल्याने आता तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. पोलीस या नवीन माहितीची पडताळणी करत आहेत. राधिकाच्या हत्येमागे केवळ आर्थिक वाद होता की जातीय अभिमानातून हे पाऊल उचलले गेले, याचा तपास सुरू आहे.