उल्हासनगरमध्ये राडा; बाईकला कट मारल्याच्या वादातून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 15:48 IST2018-11-08T15:48:23+5:302018-11-08T15:48:45+5:30
बाईकला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती उघड झाली आहे. नवीन चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे.

उल्हासनगरमध्ये राडा; बाईकला कट मारल्याच्या वादातून तरुणाची हत्या
उल्हासनगर - अगदी क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्क्कादायक घटना ठाण्यातील उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही घटना काल उशिरा रात्री घडली आहे. बाईकला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती उघड झाली आहे. नवीन चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे.
उल्हासनगरमधील कॅम्प ३ परिसरातील सम्राट अशोक नगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. नवीन चौधरी हा शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचा पुतण्या होता. नवीनची हत्या केल्यानंतर गुंडांनी परिसरात तलवारी घेऊन हैदोस घातला आणि चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. तक्रार करुनही पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेतली नाही असा स्थानिकांनी पोलिसांवर आरोप केला आहे. मात्र, काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.