क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:03 IST2025-10-21T18:01:08+5:302025-10-21T18:03:30+5:30
ही कार जवळपास १०० च्यावर स्पीडने वेगवान धावत होती. पराभवाचा तणाव आणि वेगवान कारवरील नियंत्रण सुटल्याने रचितने दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या लोकांना चिरडले.

क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
प्रयागराज - दिवाळीचा उत्साह देशभरात शिगेला पोहचला आहे. सगळीकडे खरेदीसाठी लोकांची तुडुंब गर्दी आहे. त्यातच प्रयागराज येथील एका अपघाताने संपूर्ण शहराला हादरवले आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी आहेत. या अपघात प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला परंतु यातील आरोपी चालक दुसरा तिसरा कुणी नसून शहरातील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा मुलगा रचित मध्यान आहे. या अपघातामागील कारणही पुढे आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या अपघातामागील कहाणी हैराण करणारी आहे. आरोपी चालक रचित मध्यान क्रिकेट मॅच खेळून परतत होता. मॅचमध्ये झालेल्या पराभवामुळे रचित तणावाखाली होता. त्यातूनच तो अनियंत्रितपणे वेगवाने आलिशान कार चालवत होता. १९ ऑक्टोबरच्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली. ही कार जवळपास १०० च्यावर स्पीडने वेगवान धावत होती. पराभवाचा तणाव आणि वेगवान कारवरील नियंत्रण सुटल्याने रचितने दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या लोकांना चिरडले. त्यात १ मृत्यू तर ६ गंभीर जखमी झालेत.
व्यापाऱ्याचा मुलगा अन् डॉक्टरचा जावई
या घटनेतील आरोपी रचित मध्यान शहरातील प्रसिद्ध स्वीट्स दुकान चालवणाऱ्या व्यापाराचा मुलगा आहे. खुलदाबाद येथे ते राहायला आहेत. रचितने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो क्रिकेट टीमचा कॅप्टन होता. त्याशिवाय प्रसिद्ध डॉक्टरचा तो जावई आहे. रचितच्या कारमुळे झालेल्या अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर ६ जण गंभीर जखमी झालेत.
दरम्यान, सुरुवातीला पोलिसांनी गाडी नंबरच्या आधारे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. परंतु पीडित कुटुंबाकडून आलेल्या दबावानंतर एफआयआरमध्ये रचित मध्यानचे नाव जोडण्यात आले. अपघातावेळी रचित कार चालवत होता. या अपघातात तोदेखील जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी लखनऊला शिफ्ट केले आहे. रचित आलिशान जग्वार कार चालवत होता. या अपघातात २ कार, ३ दुचाकी आणि एक सायकल यांचे नुकसान झाले आहे.