तोंडाला उंदीर बांधून करा वाल्मीक कराडची चौकशी; महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:24 IST2025-07-24T12:23:01+5:302025-07-24T12:24:12+5:30
महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल पाहून बुधवारी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संताप व्यक्त केला.

तोंडाला उंदीर बांधून करा वाल्मीक कराडची चौकशी; महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी यांची मागणी
बीड : महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल पाहून बुधवारी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संताप व्यक्त केला. एवढे क्रूरपणे मारूनही प्रशासन आरोपींची पाठराखण करत आहे. पोलिस अधीक्षकांना न्याय द्यायचा असेल तर वाल्मीक कराडला पीसीआरमध्ये घेतले पाहिजे. कराडच्या तोंडाला उंदीर बांधून त्याची चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी केली. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला. अजूनही आरोपी निष्पन्न नाहीत. महादेव मुंडे यांचा गळा कापून त्यांच्यावर हत्याराने १६ वार केल्याचे अहवालातून समोर आले.
तो म्हणाला ‘मला महाद्याचा काटा काढायचाय..’
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही धक्कादायक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. कराडच्या लहान मुलाने वाहनात बसताना ‘मला महाद्याचा काटा काढायचाय’ असे सांगितल्याचे बाळा बांगर म्हणतात. अजूनही कराडचा मुलगा म्हणतोय मी जिवंत आहे. त्यामुळे त्याच्या बापाला आधी शिक्षा झाली पाहिजे. याप्रकरणी वाल्मीक कराड, श्री कराड आणि भावड्या कराड यांनाही आरोपी करावे, अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली.
१२ गुंठ्यांसाठी वाद
या हत्येमागे १२ गुंठे जमिनीचा वाद असल्याचेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. ज्या १२ गुंठ्यांसाठी वाद झाला, ती जागा वाल्मीक कराडचा निकटवर्तीय भावड्या कराडच्या नावावर आहे. त्यामुळे तो देखील यात आरोपी झाला पाहिजे, अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली.