मुरैना - मध्य प्रदेशच्या मुरैना इथं राहणाऱ्या हरेंद्र मौर्य यांनी शनिवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांनी कळली. त्यानंतर त्यांचा मृतदेह पोस्टमोर्टमला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र आता या घटनेच्या काही तासानंतर सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं या घटनेनं वेगळेच वळण घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओत शहरातील गांधी कॉलनीत राहणाऱ्या हरेंद्र मौर्य यांना त्यांची पत्नी आणि मुलगी निर्दयीपणे दांडक्याने मारत असताना दिसतात. हरेंद्र मौर्य पलंगावर पडलेले दिसतात जिथे त्यांच्या पत्नी रचना मौर्याने पाय पकडले आहेत आणि त्यांच्या मुलीने हात पकडल्याचे दिसते. त्यात दुसरी मुलगी वडिलांनाच बेदम मारत असल्याचं चित्र समोर आले. हरेंद्र यांचा छोटा मुलगा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु मोठी बहीण त्यालाही दांडक्याचा धाक दाखवत गप्प बसवते.
हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. याबाबत पोलीस अधिकारी दीपाली चंदोलिया सांगतात की, गांधी कॉलनीतील हरेंद्र मौर्य यांच्या आत्महत्येची सूचना आम्हाला मिळाली, त्यानंतर कोतवाली पोलीस तिथे पोहचली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. परंतु व्हायरल व्हिडिओमुळे हे प्रकरण भलतेच दिसून येत आहे. मृत हरेंद्र यांची पत्नी आणि २ मुली त्यांना मारहाण करताना दिसतात. आम्ही व्हिडिओच्या आधारे चौकशी करत आहोत असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, हरेंद्र मौर्य यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, पत्नी आणि २ मुलींच्या मारहाणीमुळेच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला का या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओवरून लोक विविध चर्चा करत आहेत.
हरेंद्र यांच्या भावाचे गंभीर आरोप
या घटनेनंतर मृत हरेंद्र मौर्य यांचा छोटा भाऊ जितेंद्र यांनी गंभीर आरोप केले आहेत. वहिनी, पुतणी आणि जावई मिळून हरेंद्रला मारहाण करायचे, त्यातून त्यांचा मृत्यू झाला. या लोकांनी हरेंद्रच्या मृत्यूनंतर आत्महत्येचा बनाव रचला. हरेंद्रच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, ज्यातून त्यांना जबर मारहाण झाल्याचं दिसून येते. हरेंद्र आणि पत्नी रचना यांच्यात नेहमी वाद व्हायचे, त्यातून रचना यांनी मुलींनाही वडिलांविरोधात भडकवलं होते. हरेंद्र यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे असं जितेंद्र यांनी पोलिसांना सांगितले.