पाच मुलांची अत्याचारानंतर हत्या; 15 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येताच सहाव्या मुलीला शिकार बनवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:41 IST2025-12-08T14:41:05+5:302025-12-08T14:41:44+5:30
Punjab Crime: सहा बालकांची हत्या करणारा आरोपी मुकेश कुमारच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

पाच मुलांची अत्याचारानंतर हत्या; 15 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येताच सहाव्या मुलीला शिकार बनवले
Punjab Crime: पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय चिमुरडीची हत्या करणाऱ्या आरोपी मुकेश कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, हा त्याचा पहिलाच गुन्हा नसून, यापूर्वीही त्याने पाच निरपराध मुलांची बलात्कारानंतर निर्घृणपणे हत्या केली आहे. त्या गुन्ह्यांमध्ये 15 वर्षांची शिक्षा भोगून 2022 मध्ये जामिनावर बाहेर आला होता. आता त्याने त्याच पद्धतीने आणखी एका निष्पाप मुलाची हत्या केली आहे.
मुलगी मृतावस्थेत सापडली
मजूर कुटुंबातील ही मुलगी दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली, तेव्हा शहरातील एका परिसरात तिचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
एन्काउंटरमध्ये आरोपी जखमी
गुप्त माहितीच्या पोलिस काही तासांच्या आत आरोपीपर्यंत पोहोचले. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना मुकेशने पोलिसांवर गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये केलेल्या प्रत्युत्तरात त्याच्या पायाला गोळी लागली आणि अखेर तो पकडला गेला. अतिरिक्त चौकशीत उघड झाले की, हा आरोपी तोच मुकेश कुमार आहे, जो 29 नोव्हेंबर 2022 रोजीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.
मुकेशचा गुन्हेगारी इतिहास
2007 मध्ये आढळले पाच मुलांचे सांगाडे
जानेवारी 2007 मध्ये माघी यात्रा आणि विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान बाहेरील पोलीस दल मुक्तसरमध्ये तैनात होते. 12-13 जानेवारीच्या रात्री एका निर्जन जागेतून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांना जाणवले. तपासात चार सांगाडे सापडले. नंतर DNA तपासणीत दोन मुलं आणि दोन मुली असल्याचे निष्पन्न झाले. पाचही मुलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
चॉकलेटचे आमिष देऊन करायचा अत्याचार
तपासात उघड झाले की, मुकेश मुलांना फसवण्यासाठी चॉकलेटचे देत असे. सर्व हत्या त्याने एकाच पद्धतीने केल्या. या प्रकरणात त्याला अटक आणि 30 ऑगस्ट 2010 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जवळपास 15 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर 2022 मध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याची जामिनावर सुटका झाली. पण बाहेर आल्यावर त्याने पुन्हा असाच घृणास्पद गुन्हा केला आहे.
आता शिक्षेबाबत काय?
कायदे तज्ञांच्या मते, जर नवीन प्रकरणातील आरोप सिद्ध झाले, तर मुकेश कुमारला पुन्हा जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. त्याचा गुन्हेगारी इतिहास, विशेषतः बालकांवरील अत्याचार आणि हत्या, हे प्रकरण अतिशय गंभीर श्रेणीत मोडते.