तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील अंबरपेट भागातील प्रसिद्ध 'लँडमार्क हॉटेल'चे मालक रामराज यांनी आपली पत्नी आणि मुलासह सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला रामराज यांनी आर्थिक परिस्थितीमुळे हे पाऊल उचलल्याचे पत्रात म्हटले आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या भावाने हा दावा फेटाळून लावल्याने मृत्यूचे गूढ अधिक गडद झाले आहे.
नेमकी घटना काय?
अंबरपेट येथील आपल्या निवासस्थानी रामराज (५५), त्यांची पत्नी माधवी (५०) आणि मुलगा शशांक (२४) हे वास्तव्यास होते. मंगळवारी बराच वेळ झाला तरी घराचा दरवाजा उघडला गेला नाही आणि घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला असता, आत तिघांचेही मृतदेह आढळून आले. या दृश्याने पोलीसही हादरून गेले.
सुसाइड नोट आणि धक्कादायक मृत्यूपत्र
तपास पथकाला घटनास्थळी एक सुसाइड नोट आणि मृत्यूपत्र सापडले आहे. या चिठ्ठीत रामराज यांनी भीषण आर्थिक संकटाचा उल्लेख केला आहे. "आर्थिक अडचणींमुळे आम्ही हे जीवन संपवत आहोत," असे त्यांनी नमूद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी आपली सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता मुलगी अमूल्या हिच्या नावे केली आहे. अमूल्या सध्या कोमपल्ली भागात राहते.
भावाच्या विधानाने केस उलझली!
एकीकडे सुसाइड नोटमध्ये पैशांच्या टंचाईचा उल्लेख असताना, रामराज यांच्या भावाने मात्र पोलिसांसमोर वेगळाच दावा केला आहे. "आमचे कुटुंब पूर्णपणे संपन्न होते, रामराज यांच्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती," असे त्यांच्या भावाने स्पष्टपणे सांगितले आहे. भावाच्या या विधानामुळे आता पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला आहे की, जर पैशांची अडचण नव्हती, तर मग आत्महत्येचे खरे कारण काय? कौटुंबिक कलह की अन्य काही दबाव, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
तुंगा नगर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. "आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. ही निव्वळ आत्महत्या आहे की यामागे काही वेगळे षडयंत्र आहे, हे लवकरच स्पष्ट होईल," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.