उपनिरीक्षकासह दोन पोलिसांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, हत्या प्रकरणातील कैद्याने रचला डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 21:14 IST2020-10-09T21:12:53+5:302020-10-09T21:14:42+5:30
Crime News : ठाण्यातील घटना: गुन्हे शाखेने केली अटक

उपनिरीक्षकासह दोन पोलिसांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, हत्या प्रकरणातील कैद्याने रचला डाव
ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर सुटल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट भागात पसार झालेल्या नवनाथ धांडगे या खूनातील कैद्याने ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक दत्ता सरक आणि पोलीस हवालदार आनदा भिलारे हे दोघेजण जखमी झाले. या धुमश्चक्रीनंतर नवनाथ याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
वागळे इस्टेट येथील एका खून प्रकरणामध्ये 2015 मध्ये नवनाथ याला oरीनगर पोलिसांनीअटक केली होती. याच गुन्हयामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. दरम्यान कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असतांना राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे 2 एप्रिल 2020 रोजी कारागृह प्रशासनाने त्याला 45 दिवसांच्या अभिवचन रजेवर बाहेर सोडले होते. मात्र, मुदत संपूनही तो पुन्हा कारागृहात न गेल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात 5 ऑगस्ट 2020 रोजी ठाणो जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयाचा ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या मार्फतीने समांतर तपास सुरु होता. तेंव्हा नवनाथ हा वागळे इस्टेट येथील रामनगर भागातील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, उपनिरीक्षक दत्ता सरक, भिलारे, हवालदार आबुतालीफ शेख, शिवाजी गायकवाड, पोलीस नाईक संजय बाबर आदींच्या पथकाने 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. त्यावेळी त्याने या पथकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उपनिरीक्षक सरक आणि हवालदार भिलारे हे दोघे जखमी झाले. त्याचवेळी पथकातील इतरांनी नवनाथ याला पळून जाण्याची संधी न देता अटक केली. सरक आणि भिलारे या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.