गरोदर पत्नीचा खून करून रचला बनाव; नेपाळच्या युवकाला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 08:22 IST2025-03-05T08:22:12+5:302025-03-05T08:22:35+5:30
या घटनेत पोलिसांनी पत्नीच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवणाऱ्या पती विकीला चौकशीसाठी बोलावले. यावेळी त्याची उडवाउडवीची उत्तरे पाहून पोलिसांना संशय आला.

गरोदर पत्नीचा खून करून रचला बनाव; नेपाळच्या युवकाला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक - शहरातील चांदशी शिवारात गोदाकाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीझुडुपात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला. हा मृत एका गरोदर विवाहितेचा होता. महिलेसोबत घातपात झाल्याचं पोस्टमोर्टममधून उघड झालं. मयत महिलेच्या पतीने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर नाशिक तालुका पोलिसांनी संशयित आरोपी विवाहितेचा पती विकी राय सुकेसर याला बेड्या ठोकल्या. आरोपी हा मूळचा नेपाळच्या सातपूर इथला रहिवासी आहे.
चांदशी शिवारात गोदाकाठाशेजारून आनंदवली पुलाकडे जाणाऱ्या जुन्या चांदशी रस्त्यावर निर्जनस्थळी संशयित विकी हा त्याची पत्नी अमृताकुमारी सुकेसर हिला ३-४ दिवसांपूर्वी घेऊन गेला होता. याठिकाणच्या बाभळीच्या झाडांमधून टेकडीवर गेल्यानंतर तेढे ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून आरोपी तिथून पसार झाला.
बेपत्ता असल्याचा रचला बनाव
पत्नीचा खून करून पती दुपारी पावणे तीनच्या सुमारास पंचवटी पोलीस स्टेशनला आला. तिथं त्याने २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गांधी तलाव येथून त्याची पत्नी अमृताकुमारी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी ही तक्रार नोंद करून घेतली.
चारित्र्यावर संशय
आरोपी विकी हा पत्नी अमृताकुमारी हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. त्यातूनच त्याने गळा आवळून पत्नीचा खून केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं. आरोपी हा मूळचा नेपाळच्या सरलाई जिल्ह्यातील हरिपुवा गावातील रहिवासी असून तो मागील काही महिन्यांपासून सातपूरच्या घाटोळ गल्लीत राहत होता. विकी हा मोलमजुरीची कामे करत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी दिली.
पोस्टमोर्टमधून हत्या झाल्याचं उघड
बेवारस अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. या रिपोर्टमध्ये गळा आवळून खून झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी शहरातील सातपूर, अंबड, पंचवटी, मेरी, म्हसरूळ या पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठवले. त्यावेळी पंचवटी पोलिसांनी या महिलेच्या बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्याची माहिती दिली.
दरम्यान, या घटनेत पोलिसांनी पत्नीच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवणाऱ्या पती विकीला चौकशीसाठी बोलावले. यावेळी त्याची उडवाउडवीची उत्तरे पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस येऊन तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.