भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:29 IST2025-08-28T15:28:47+5:302025-08-28T15:29:54+5:30
कुरिया गावाजवळील औद्योगिक परिसरात संध्याकाळी ४ च्या सुमारास एकाने पॉलिथीनच्या पिशवीत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह टाकून फरार झाला.

भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
प्रयागराज - शहरातील औद्योगिक परिसरात मंगळवारी शीर आणि हात-पाय कापलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. मृतकाची ओळख ११ वी शिकणारा पीयूष अशी पटली. तो करेलीच्या सादियापूर येथे राहणारा होता. या मुलाच्या हत्येसाठी नात्याने आजोबा लागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी जबाबदार धरले आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. चौकशीत त्याने सांगितलेल्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करून कापलेले शीर आणि हात-पायही पोलिसांनी जप्त केले आहेत.
कुरिया गावाजवळील औद्योगिक परिसरात संध्याकाळी ४ च्या सुमारास एकाने पॉलिथीनच्या पिशवीत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह टाकून फरार झाला. तपासात पोलिसांना या घटनास्थळाचे सर्व व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात मिर्जापूर रोडवर ५० हून अधिक कॅमेरे तपासले असता स्कूटीवर जाणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला. जुन्या पुलावरून तो प्रयागराज-मिर्जापूर हायवेच्या मार्गे औद्योगिक परिसरात पोहचला होता. तपासात ही स्कूटी सदियापूर गुरुद्वारा येथे राहणाऱ्या शरण सिंहची असून तो प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतो असं समोर आले.
शरण सिंहच्या पुतण्याचा मुलगा पीयूष मंगळवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याचे वडील अजय सिंह यांचे निधन झाले आहे. तो आईसोबत सदियापूर येथे राहायचा. त्याची आई म्हणाली की, मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला. रोज दुपारी २.३० वाजता तो घरी परततो, मात्र त्यादिवशी परतला नाही. शाळेत जाऊन चौकशी केली तेव्हा तो तिथेही नव्हता. या घटनेत पोलिसांनी शरण सिंहचा शोध घेतला आणि काही तासांत त्याला करेली येथून ताब्यात घेण्यात आले. या घटनेत पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत शरण सिंहची चौकशी केली तेव्हा त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला.
हत्येमागचे कारण काय?
दरम्यान, पोलिस चौकशीत आरोपी शरण सिंहने धक्कादायक खुलासा केला. काही काळापूर्वी आरोपीची मुलगी आणि मुलगा दोघांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शरण सिंहला धक्का बसला. तेव्हा त्याने एका तांत्रिकाशी संपर्क केला. ज्याने जर तुम्ही तुमच्या मुलगा किंवा मुलगी यांच्या वयाच्या मुलाचा बळी दिला तर तुमचे ग्रहदोष दुरू होतील असं त्याला सांगितले. त्यानंतर शरण सिंहने पीयूषच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर आरोपीने पीयूषचे हात पाय आणि शीर कापून एका जंगलात फेकले आणि उर्वरित धड स्कूटीवरून औद्योगिक परिसरात फेकले. या घटनेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तांत्रिकाच्या सांगण्यावरून आरोपीने नरबळी दिला आहे. पोलिस अजून चौकशी करत असल्याचे डीसीपी अभिषेक भारती यांनी सांगितले.