प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:49 IST2025-08-03T06:48:21+5:302025-08-03T06:49:46+5:30
प्रज्वलविरोधात बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे चार खटले सुरू असून, त्यातील एका प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी त्याला दोषी ठरविले...

प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
बंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू, माजी खासदार आणि जनता दल (सेक्यूुर) या पक्षातून निलंबित केलेला नेता प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात खासदार-आमदारांसाठी असलेले विशेष न्यायाधीश संतोष भट यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी रेवण्णाला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला, तसेच पीडित महिलेला ७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
प्रज्वलविरोधात बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे चार खटले सुरू असून, त्यातील एका प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी त्याला दोषी ठरविले. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होळेनरसीपुरा येथील त्याच्या गणिकाडा फार्महाउसवर काम करणाऱ्या ४८ वर्षे वयाच्या महिलेवर त्याने दोन वेळा बलात्कार केला. हसनमधील फार्महाउस, तसेच बंगळुरूमधील निवासस्थानी त्याने हे गैरकृत्य केल्याचा आरोप होता. त्याने या कृत्याचे मोबाइलद्वारे चित्रीकरणही केले. २०२१च्या या प्रकरणात रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली, तर मी काही चुकीचे केलेले नाही, मी काहीही चुकीचे वर्तन केलेले नाही, असे रेवण्णाने न्यायालयाला सांगितले.
राजकारणामध्ये मला लवकर यश मिळाले ही माझी मोठी चूक होती. त्यामुळेच माझ्यावर अनेक आरोप झाले, असा रेवण्णाने स्वत:चा बचाव केला. आपण कसे चांगले आहोत हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला.
मला सौम्य शिक्षा द्या; रेवण्णाची कोर्टाला विनंती
रेवण्णा न्यायालयात भावुक झाला होता. त्याने सांगितले की, सहा महिन्यांपासून मी माझ्या आई-वडिलांना पाहिलेले नाही. माझे कुटुंबीय चिंतेत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मला कृपया सौम्य शिक्षा द्या. विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सप्टेंबर २०२४ मध्ये १६३२ पानी आरोपपत्र दाखल केले. ११३ जणांच्या साक्षी झाल्या.
प्रज्वलने चित्रित केलेले व्हिडीओ ठरले सबळ पुरावे
विशेष सरकारी वकील अशोक नायक व अतिरिक्त सरकारी वकील बी. एन. जगदीश म्हणाले की, न्यायालयाने सर्व आरोपांबाबत रेवण्णाला दोषी ठरवले. पीडितेची साक्ष, डिजिटल पुरावे, डीएनए अहवाल आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल सादर करण्यात आला. आरोपीने स्वतः बलात्काराचे व्हिडीओ चित्रित केले होते. हे डिजिटल पुरावेही आरोप सिद्ध करण्यास महत्त्वाचे ठरले.