"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:50 IST2025-10-31T18:49:51+5:302025-10-31T18:50:14+5:30
या प्रोजेक्टमध्ये माझी शिक्षकाची भूमिका होती. मी प्रोजेक्ट कंट्रोलर म्हणूनही काम करत होतो. परंतु रोहितने आरए स्टुडिओ भाड्याने घेतला होता असं रोहनने सांगितले.

"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
मुंबई - शहरातील पवई भागात असणाऱ्या आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात कारवाई करून मुलांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी झालेल्या चकमकीत रोहित जखमी झाला. त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. आता या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी रोहन आहेरचा जबाब समोर आला आहे.
प्रत्यक्षदर्शी रोहन याच प्रोजेक्टवर आरोपीसोबत काम करत होता. परंतु त्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रोहनने आरोपीसोबत याआधी अनेक प्रोजेक्टवर काम केले आहे. परंतु पैशाच्या वादामुळे त्याने तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर चौथ्या प्रोजेक्टमध्ये तो पुन्हा आरोपीच्या संपर्कात आला. रोहन रोहितला गेल्या अनेक वर्षापासून ओळखत होता. त्याने स्वत:च रोहनला या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बोलावले. मला कधीच वाटले नाही तो असं काही करेल. मी २-३ महिन्यापासून त्याच्यासोबत काम करत होतो. पहिले मुलांची ऑडिशन करूया असं त्याने सांगितले होते. मार्चमध्ये सिनेमाला शुटींगला सुरुवात होणार होती. मी जेव्हा त्याच्याकडे स्क्रिप्ट मागितली तेव्हा अजून त्यावर काम सुरू आहे असं त्याने उत्तर दिले. आम्ही याआधी ऑडिशन केल्या होत्या. रोहित आर्य मुले स्वत: ऑडिशनसाठी बोलवत होता असं त्याने सांगितले.
या प्रोजेक्टमध्ये माझी शिक्षकाची भूमिका होती. मी प्रोजेक्ट कंट्रोलर म्हणूनही काम करत होतो. परंतु रोहितने आरए स्टुडिओ भाड्याने घेतला होता. ऑडिशनसाठी मुले तिथेच बोलवण्यात आली. ही मुले ४ दिवसांपासून माझ्यासोबत होती. सिनेमा बनणार आहे एवढेच मुलांना माहिती होते. वर्कशॉप असेल, ट्रायल शूट होईल एवढीच माहिती ऑडिशनआधी आमच्याकडे होती. २९ ऑक्टोबरला सर्व गोष्टी संपल्या होत्या परंतु रोहितने ३० तारखेपर्यंत वाढवण्यास सांगितले आणि ३० तारखेला त्याने हा प्रकार केला असं रोहनने माध्यमांना मुलाखत देताना म्हटलं.
घटनेच्या दिवशी काय पाहिले?
दरम्यान, घटनेच्या दिवशी आमचं ९.३० चं शेड्युल्ड होते. परंतु मला लेट झाला होता. आमचा स्पॉटबॉय दरवाज्यावर उभा होता. कुणीही आला तरी त्याला आत पाठवू नकोस असं रोहितने त्याला सांगितले होते. मी विचारले तेव्हा रोहित आतमध्ये मुलांसोबत प्रॅक्टिस करत असल्याचे सांगितले. डायरेक्टर असल्याने तो प्रॅक्टिस करत असेल असं मला वाटले. सर्वकाही ठीक सुरू होते. परंतु जेव्हा मी लॅपटॉप घेऊन खाली आलो, चावी घेण्यासाठी रोहितकडे गेलो त्याने नकार दिला. तेव्हा मला काहीतरी गडबड आहे असा संशय आल्याचं रोहनने सांगितले.
पोलीस कसे आले?
मला वेगळे काही घडतंय असा संशय आल्यानंतर मी धावत खाली आलो. माझा भाऊ रविला सांगितले. रोहितच्या डोक्यात भलतेच काही सुरू आहे. तो वेड्यासारखा वागत आहे असं सांगितले. तेव्हा रवी पोलीस स्टेशनला गेला. मी खाली आल्यानंतर पोलिसांशी बोलत होतो. पोलिसांनी मला आम्ही मागच्या रस्त्याने येतो तुम्ही तयार राहा. मी पोलिसांना शिरता यावे यासाठी काचेचा दरवाजा हातोड्याने तोडला होता. ज्यात मलाही इजा झाली. मात्र काच फुटल्यानंतर रोहितने माझ्यावर पेपर स्प्रे ने हल्ला केला. त्यात मी खाली पडलो. मी रोहितला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याचा हट्ट करत होता. तो माझे काहीही ऐकत नव्हता असंही रोहनने सांगितले.