गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
By राजन मगरुळकर | Updated: April 29, 2025 22:51 IST2025-04-29T22:50:21+5:302025-04-29T22:51:09+5:30
घराच्या झडतीत गावठी पिस्तुल, तलवारी, घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली

गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
राजन मंगरुळकर, परभणी : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नांदखेडा येथून एका सराईत गुन्हेगाराच्या घरातून आणि वाहनातून गावठी पिस्टल, तलवारी आणि इतर घातक शस्त्र जप्त केले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. यामध्ये एक अवैध अग्निशस्त्र, चार जिवंत काडतूस, तीन तलवारी, एक खंजर, गुप्ती, कत्ती, राँड आणि चारचाकी वाहन असा एकूण दहा लाख ३७ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी परभणी ग्रामीण ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद केला. संबंधित काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यावरुन केलेल्या कारवाईत पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला.
पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. नांदखेडा येथील सराईत गुन्हेगार शेर खान पठाण व त्याचे काही मित्र हे राहत्या घरी व तो वापरत असलेल्या वाहनांमध्ये धारधार हत्यार, अग्निशस्त्र बाळगून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यावरून पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व पथकाने नांदखेडा येथे शेर खान पठाण यास शिताफिने सापळा रचून पकडले. त्याच्यासोबत अन्य एक सराईत गुन्हेगार हनुमंत रमेश सोनटक्के (रा.वाणी पिंपळगाव, ता.पालम) हा मिळून आला. त्याच्या ताब्यातील (एमएच २३ एआर २९३९) मध्ये घातक अग्निशस्त्र व तलवार मिळून आले. घर झडतीमध्ये सुद्धा घातक शस्त्र मिळाले. नमूद दोघांवर अन्य काही ठिकाणी यापूर्वी गुन्हे नोंद आहेत.