स्वप्नात दिसू लागला मृत्यू झालेला मुलगा; शेजाऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईने कबूल केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:42 IST2023-09-07T11:41:31+5:302023-09-07T11:42:48+5:30
निष्पाप मुलगा पुन्हा पुन्हा महिलेला स्वप्नात दिसू लागला. यानंतर एक दिवस घाबरलेल्या आईने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला.

फोटो - punjab kesari
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. थाटीपूर पोलीस स्टेशन परिसरात एका आईने आपल्याच मुलाला छतावरून फेकून दिलं आणि अपघात झाल्याची खोटी गोष्ट सांगून कुटुंबाला फसवलं. पण त्याच्या मृत्यूनंतर, निष्पाप मुलगा पुन्हा पुन्हा महिलेला स्वप्नात दिसू लागला. यानंतर एक दिवस घाबरलेल्या आईने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
तारामई कॉलनीत राहणारे ध्यान सिंह राठौड हे मध्यप्रदेश पोलिसात हवालदार पदावर कार्यरत आहेत. ध्यान सिंह यांचा विवाह भिंड येथील रहिवासी ज्योतीशी 2017 मध्ये झाला होता. ज्योती पती आणि दोन मुलांसह राहत होती. याच दरम्यान 28 एप्रिल रोजी मुलगा जतीन याचा गच्चीवरून पडून मृत्यू झाला. नातेवाईकांनी जतीनचा मृत्यू हा अपघात मानला आणि काही दिवसांनी सर्व काही सामान्य झाले. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर ज्योतीला भीती वाटू लागली.
पतीला वाटलं की आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. हळूहळू सर्व काही बरं होईल. पण ज्योतीची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. जतीनचा आत्मा घरात फिरतोय असं ज्योतीला वाटायचं. त्यामुळेच तिने पतीसमोर आपला गुन्हा कबूल केला. ज्योतीने सांगितलं की तिला जतीनला मारायचं नव्हतं. यानंतर ध्यान सिंह यांनी संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी ज्योतीचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. ध्यान सिंह यांनी ज्योतीला या घटनेबाबत विचारणा केली असता तिने वेगवेगळी विधानं देण्यास सुरुवात केली.
पतीचा संशय बळावला. यानंतर तिने एक दिवस रडत रडत पतीला सर्व घटना सांगितली. मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेल्या पुराव्याच्या आधारे ध्यान सिंह यांनी थाटीपूर पोलीस ठाण्यात ज्योतीविरुद्ध एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी ज्योतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. प्रेमसंबंधांमुळे मुलाची हत्या केल्याचं तिने सांगितलं.
चौकशीत तिने आपला शेजारी उदय याच्याशी प्रेमसंबंध असल्याचं सांगितले. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी घरी काही कार्यक्रम होता. पतीसह अनेकजण आदरातिथ्य करण्यात व्यस्त होते. याच दरम्यान ज्योती रात्री तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गच्चीवर पोहोचली. आईला गच्चीवर येताना पाहून जतीनही तिच्या मागे गेला. त्याला त्याची आई प्रियकराच्या मिठीत दिसली. यानंतर ज्योती घाबरली आणि उघडकीस येण्याच्या भीतीने तिने मुलगा जतीन याला गच्चीवरून खाली पाडलं. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.