चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:30 IST2025-12-21T09:30:58+5:302025-12-21T09:30:58+5:30
काही युवक शाळेतून येता जाता माझी छेड काढत असतात असं पीडित मुलीने वडिलांना सांगितले.

चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
बरेली - उत्तर प्रदेशच्या बदायू येथे अनोखा प्रकार समोर आला आहे. आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला त्रास देणाऱ्या आरोपात पोलिसांनी चार टवाळखोरांच्या आईलाच अटक केली आहे. आरोपी मुलेही १३ वर्षाहून कमी वयाची आहेत. ही कारवाई आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत त्याला जबाबदार म्हणून करण्यात आली आहे. या महिलांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि सब डिविजनल मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना खाजगी जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.
काही युवक शाळेतून येता जाता माझी छेड काढत असतात असं पीडित मुलीने वडिलांना सांगितले. त्यानंतर कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठत या मुलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी अजय पाल सिंह म्हणाले की, हे आरोपी अल्पवयीन असून अल्पसंख्याक समुदायातून येतात. ते शाळेत जात नाहीत, दिवसभर परिसरात फिरत राहतात. आरोपी मुले आणि पीडित मुलगी एकमेकांना वैयक्तिक ओळखत नाहीत. हे आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांना नोटीस पाठवली होती. मुलांचे व्यवस्थित संगोपन न करणे आणि चांगले संस्कार न दिल्याबद्दल पोलिसांनी आरोपींच्या आईला अटक केली आहे. मुलांवर संस्कार करण्यास ते अयशस्वी ठरले त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वडिलांनाही करणार अटक
चारही आरोपींचे वडील सध्या उत्तर प्रदेशाबाहेर काम करतात. ते घरी परतल्यानंतर त्यांनाही अटक केली जाईल. मुलांच्या कृत्याप्रकरणी जबाबदार म्हणून पोलिसांनी ही कारवाई केलीय. या प्रकरणी कायदे विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली. BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेत काही तरतुदी बदलण्यात आल्या आहेत. त्यातून पोलीस सार्वजनिक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अथवा संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी काही तरतुदीतून कारवाई करू शकतात. कुठलीही सूचना न देता अथवा जाणुनबुजून अल्पवयीन आरोपींच्या आई वडिलांविरोधात या तरतुदींचा वापर करणे दुर्लभ आहे आणि कोर्टात याला आव्हान दिले जाऊ शकते.
दरम्यान, पॉक्सो अंतर्गत बाल लैंगिक शोषणातील आरोपींना वाचवण्यासाठी काही प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे. परंतु जोपर्यंत निष्काळजीपणा अथवा उकसवण्याचे पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत पालकांना दोषी ठरवता येत नाही असंही तज्ज्ञ सांगतात.