प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:03 IST2025-05-24T14:01:53+5:302025-05-24T14:03:32+5:30
सात तरुणांच्या टोळीने मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढून, त्यांना ब्लॅकमेल करत शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील नागदामधून एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. सात तरुणांच्या टोळीने मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढून, त्यांना ब्लॅकमेल करत शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे. ही घटना नागदा येथील बिर्लाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणात पोलिसांनी सातपैकी सहा आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींमध्ये सुफियान, सोहेल, तोहीद, वीरू, अरुण आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आणखी एक संशयित फरार आहे.
मोबाईल आणि पेन ड्राइव्हमध्ये सापडले अश्लील व्हिडीओ
बिर्लाग्राम पोलीस स्टेशनचे प्रभारी अमृतलाल गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीआयच्या परिसरात तपासणीदरम्यान काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना थांबवण्यात आले. पण ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्हमध्ये स्थानिक मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडले.
तीन वर्षांपासून सुरू होता अमानुष प्रकार
ही टोळी गेल्या तीन वर्षांपासून मुलींना फसवून त्यांचे शोषण करत होती. प्रथम मैत्री करून, नंतर प्रेमाचे आमिष दाखवत त्या मुलींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात होते. याच वेळी इतर टोळी सदस्य त्या संबंधांचे चित्रीकरण करत आणि नंतर तेच व्हिडीओ दाखवून पीडितांना ब्लॅकमेल करत असल्याचे, प्राथमिक तपासात उघड झाले.
पोलिसांची कठोर कारवाई
या गंभीर प्रकरणाची दखल घेत एसपी प्रदीप शर्मा यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली आणि त्यांना काठीने फटके देखील दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी काही जण ऑटो रिक्षा चालवतात, तर काही मोबाईल दुकानात काम करतात. पोलिसांकडून पीडित मुलींचे जबाब नोंदवले जात आहेत.