वास्तू पुजनाच्या भोजनातून १०४ जणांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:20 IST2021-06-03T15:19:23+5:302021-06-03T15:20:25+5:30
Food Poisoning : भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथील घटना, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

वास्तू पुजनाच्या भोजनातून १०४ जणांना विषबाधा
भंडारा : वास्तू पुजनाच्या कार्यक्रमातील भोजनातून १०४ जणांना विषबाधा होण्याची घटना भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सर्वांवर गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचार करुन सुटीही देण्यात आली.
कोथुर्णा येथील गजानन खोकले यांच्या नवीन घराचे बुधवारी वास्तू पुजन होते. सर्व गावकऱ्यांना भोजनाचे आमंत्रण होते. रात्री अनेकांनी येथे भोजन केले. मात्र गुरूवारी सकाळी काही जणांना मळमळ, उलटी, हगवणीचा त्रास सुरु झाला. त्यांना गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत १०४ जणांवर उपचार करुन सुटी देण्यात आली. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. स्वयंपाकासाठी विहिरीचे व पिण्यासाठी नळाचे पाणी वापरण्यात आले होते. या पाण्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. गावात आरोग्य यंत्रणा दाखल झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके यांनी गावाला भेट दिली.