मुस्लिम मुख्याध्यापकाला पदावरुन टाकण्यासाठी रचला भयंकर कट; आरोपींना पाण्याच्या टाकीत मिसळलं 'विष'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:32 IST2025-08-04T15:18:37+5:302025-08-04T15:32:41+5:30
कर्नाटकात एका शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुस्लिम मुख्याध्यापकाला पदावरुन टाकण्यासाठी रचला भयंकर कट; आरोपींना पाण्याच्या टाकीत मिसळलं 'विष'
Karnataka Crime:कर्नाटकात एका शाळेत विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. कर्नाटकातील बेळगावमध्ये सरकारी शाळेतील मुस्लिम मुख्याध्यापकाला काढून टाकण्यासाठी काही जणांनी पाण्याच्या टाकीत विष मिसळले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यामध्ये श्री राम सेनेच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. आरोपींच्या कृत्यामुळे काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा निषेध करत धार्मिक कट्टरतेतून हे घडल्याचे म्हटलं.
बेळगाव जिल्ह्यातील हुलिकट्टी गावातील सरकारी शाळेत पिण्याच्या पाण्यात विष टाकल्याच्या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. मुस्लिम मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी हे कृत्य केल्याचे समोर आलं. पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याने १२ विद्यार्थी आजारी पडले होते. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर याबाबत खुलासा झाला. एकाच वेळी अनेक मुले आजारी पडल्याने शाळेतच काही तरी घडल्याचा संशय पोलिसांना होता. विद्यार्थी आजारी पडल्यामुळे पालकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं.
तपासादरम्यान पाण्यात विष कालवण्याचा प्रकार पाचवीच्या एका विद्यार्थ्याने केल्याचे पोलिसांना आढळून आले. त्या विद्यार्थ्याची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की बाटलीत एक हानिकारक पदार्थ देण्यात आला होता. तो पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितले होते. विद्यार्थ्याने पोलिसांना बाटली देणाऱ्या व्यक्तीचे नाव कृष्णा मदार असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या चौकशीत कृष्णाने कुणाच्या तरी दबावाखाली हे कृत्य केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सागर पाटील आणि नागनगौडा पाटील यांनी ब्लॅकमेल करत कृष्णाकडून हे काम करुन घेतलं गेलं. दोघांनीही कृष्णाला त्याचे आंतरजातीय प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी दिली होती. कृष्णाने त्यांचे म्हणणं ऐकलं आणि मुलाला विषाची बाटली दिली. सागर पाटील हा श्रीराम सेनेचा तालुकास्तरीय नेता आहे. तो या संपूर्ण घटनेचा सूत्रधार होता.
सागर पाटीलने चौकशीदरम्यान सांगितले की स्थानिक सरकारी शाळेत मुस्लिम मुख्याध्यापक नियुक्त झाल्यामुळे तो रागावला होता. मुख्याध्यापकाची बदली व्हावी म्हणून आरोपींनी हे कृत्य करुन परिसरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी सागर पाटील, नागनगौडा पाटील आणि कृष्णा मदार या तिघांना अटक केली आहे.
"बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यातील हुलिकट्टी गावातील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांची इतरत्र बदली करण्याच्या दुष्ट हेतूने, शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळल्याबद्दल श्री राम सेनेचे तालुकाध्यक्ष सागर पाटील आणि इतर दोघांना अटक करण्यात आली आहे," असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं.