बिहारमधील शिवहर येथील आमदार चेतन आनंद यांनी पाटणा एम्स रुग्णालयात त्यांच्यासोबत आणि पत्नीसोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल पोलीस तक्रार दाखल केली आहे. बुधवारी रात्री चेतन आनंद आपल्या पत्नीसोबत रुग्णालयात दाखल असलेल्या एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि पत्नीलाही धक्काबुक्की केली.
चेतन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पत्नी आणि सुरक्षा रक्षकासह एम्समध्ये पोहोचले होते, परंतु रुग्णालयाच्या गेटवर आत जाण्यापासून रोखण्यात आलं. त्याच वेळी काही इतर कर्मचारीही आले आणि त्यांच्या पत्नीशी गैरवर्तन करू लागले. एम्सच्या काही कर्मचाऱ्यांनी पत्नीला ढकललं, ज्यामुळे तिच्या मनगटाला आणि पाठीला दुखापत झाली. जेव्हा मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही काळ मला कोंडून ठेवण्यात आलं.
या घटनेनंतर आमदार थेट स्थानिक पोलीस ठाण्यात गेले आणि संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार दिली. या संपूर्ण प्रकरणात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि एका लोकप्रतिनिधीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याच दरम्यान, यावर पाटणा शहर (पश्चिम) चे पोलीस अधीक्षक भानु प्रताप सिंह म्हणाले की, एम्स प्रशासन आणि आमदार दोघांकडूनही तक्रारी आल्या आहेत.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चेतन आनंद आधी आरजेडीमध्ये होते परंतु आता ते जेडीयूमध्ये सामील झाले आहेत. त्यांची आई लवली आनंद सध्या खासदार आहेत आणि शिवहार लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.