मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील गुनौर पोलीस स्टेशन परिसरातील भटनवारा गावात एका नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. कुटुंबाने सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भटनवारा येथील रहिवासी २१ वर्षीय सपना दहायत हिने रविवारी दुपारी तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सपनाचं लग्न १७ नोव्हेंबर २०२४ रोजी रामचंद्र दहायतशी झालं होतं. आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच गुनौरचे एसडीओपी आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक भदौरिया त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेच्या कुटुंबाने मुलीच्या पती आणि त्याच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आणि सांगितलं की, मुलीचा अनेकदा हुंड्यासाठी छळ केला जात असे. लग्नापासूनच तिच्यावर अत्याचार होत होते. पण काही महिन्यांपासून मुलीने सर्व काही सहन केलं आणि आम्हाला काहीही सांगितलं नाही.
महिलेच्या कुटुंबाने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. सपनाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, सासरचे लोक मुलीला हुंड्यासाठी सतत त्रास देत होते. मुलीची हत्या करण्यात आली आहे. आम्ही आमच्या क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला पण तरीही सासरच्यांची हाव कमी झाली नाही. महिलेच्या आईने न्यायाची मागणी केली आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व पैलूंवर तपास सुरू केला आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक भदोरिया म्हणाले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि महिलेच्या कुटुंबाची आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.