खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:13 IST2025-06-06T11:09:33+5:302025-06-06T11:13:29+5:30
हेरगिरी प्रकरणाबाबत केलेल्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
महाराष्ट्र एटीएसने हेरगिरी प्रकरणाबाबत केलेल्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कने भारतात फक्त हनीट्रॅपचा आधार घेतला नाही तर व्हॉट्सएप आणि टेलिग्राम अकाउंटच्या प्रोफाइल फोटोमध्ये देवदेवतांचे आणि प्रसिद्ध मंदिरांचे फोटो ठेवले. जेणेकरून भारतीय लोकांना ते आपले वाटतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रोफाईल्सचं लोकेशन टॅगिंग देशातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांशी देखील जोडले गेलं होतं, जेणेकरून हे नंबर भारतातील दिसतील आणि कोणालाही संशय येणार नाही. सांस्कृतिक गोष्टींद्वारे विश्वास जिंकण्यासाठी आणि संशयापासून वाचण्यासाठी ही एक सुनियोजित रणनीती होती असं तपास यंत्रणांनी म्हटलं आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्मावर भारतीय युद्धनौकांशी संबंधित संवेदनशील माहिती लीक केल्याचा गंभीर आरोप आहे.
एटीएसने न्यायालयाला सांगितलं होतं की, त्यांना नवीन इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत, ज्याच्या तपासासाठी रिमांडची आवश्यकता आहे, परंतु न्यायालयाने ते नाकारलं. रवी वर्माच्या वतीने वकील रूपाली शिंदे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, एटीएसच्या तपासात विरोधाभास आहे.
एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितलं की 'प्रीती जयस्वाल' आणि 'सर' ही नावं प्रत्यक्षात पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) नेटवर्कद्वारे वापरली जाणारी खोटी नावं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हनीट्रॅप ऑपरेशनमध्ये अनेक मोबाईल नंबर वापरले गेले होते जे दिल्ली, मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये रजिस्टर होते आणि बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड मिळवून एक्टिव्ह केले गेले होते. तपासात असं दिसून आलं आहे की, या एजंटचे नंबर रवी वर्माच्या मोबाईलमध्ये 'प्रीती फ्रेंड', 'जसप्रीत कॉलेज फ्रेंड', 'निशा फ्रेंड', 'आकृती फ्रेंड' अशा सामान्य नावांनी सेव्ह केले गेले होते.