विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:25 IST2025-10-16T12:24:54+5:302025-10-16T12:25:04+5:30
२२ दिवसांचे ऑपरेशन, १,८०० किमीचा प्रवास अन् १७ जणांना मोक्का, चाैघांचा शाेध सुरू

विशाखापट्टणमच्या जंगलात राबवले ‘ऑपरेशन सिंडिकेट’; १३ तस्करांना बेड्या
- सचिन सागरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या आंतरराज्य गांजा तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करीत खडकपाडा पोलिसांनी १८०० किमी प्रवास करून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलात ‘ऑपरेशन सिंडिकेट’ राबवले. सलग २२ दिवसांची मोहीम चालवून १३ तस्करांना बेड्या ठोकल्या तर चौघांचा शोध सुरू आहे.
मोक्का अंतर्गत १७ जणांवर कारवाई केली. टोळीच्या ताब्यातून ११५ किलो गांजा, पिस्तूल, काडतुसे व वॉकी-टॉकी संच असा मुद्देमाल हस्तगत केला. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेली ही अशाप्रकारची पहिलीच कारवाई ठरली आहे. अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती आंधळे, सहायक निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक आयुक्त कल्याणजी घेटे करीत आहेत.
‘गुरफान’ टोळीचा मुख्य सूत्रधार
या टोळीचा प्रमुख गुरफान हन्नान शेख (२९, रा. बल्याणी) असून, त्याच्यासह बाबर शेख (आंबिवली), सुनील राठोड (बदलापूर), आझाद शेख (अंबरनाथ), रेश्मा शेख (मुंब्रा), शुभम ऊर्फ सोन्या भंडारी (पुणे), असिफ शेख (मुंबई), सोनू सय्यद (मानखुर्द), प्रथमेश नलवडे (सोलापूर), रितेश गायकवाड (सोलापूर), अंबादास खामकर (पुणे), आकाश भिताडे (सोलापूर) आणि योगेश जोध (सोलापूर) यांच्यासह अन्य चार जणांवर ही कारवाई करण्यात आली. सर्व आरोपींवर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात गुन्हे दाखल आहेत.
आंध्र प्रदेशच्या जंगलात शोध मोहीम
गांजा तस्करी प्रकरणातील तपासाची सुरुवात आंबिवली येथे १०० ग्रॅम गांजासह एका आरोपीच्या अटकेने झाली. पुढील धागेदोरे तपासताना पोलिस पथकाने कल्याण, बदलापूर, पुणे, सोलापूरमार्गे थेट विशाखापट्टणमच्या घनदाट जंगलात मोहीम राबवली. शेवटी तेथूनच मोठ्या प्रमाणावर तस्करीचे जाळे उघडकीस आले.
जंगलात नेटवर्क नाही, म्हणून वॉकी-टॉकीचा वापर
घनदाट जंगलात मोबाइल नेटवर्क नसल्याने टोळी वॉकी-टॉकीच्या माध्यमातून संपर्क साधत होती.
येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून बाहेरच्यांना आत येऊ न देण्यासाठी टोळीने खबरदारी घेतली होती. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी गांजा खरेदी-
विक्री व पुरवठ्याचा मोठे रॅकेट चालवत होती.
कोटया टोळीचा बीमोड करणे अत्यावश्यक होते. राज्यभरात गांजाची विक्री करून ही टोळी तरुणांना व्यसनाच्या जाळ्यात ओढत होती. सखोल तपासानंतर सर्व १७ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
अतुल झेंडे,
पोलिस उपायुक्त, कल्याण