ऑनलाईन चिटिंग : नागपुरात भाजपा प्रसिद्धीप्रमुखाला सायबर गुन्हेगाराचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:12 AM2020-01-05T00:12:57+5:302020-01-05T00:13:46+5:30

पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याची थाप मारून एका सायबर गुन्हेगाराने भाजपाचे शहर प्रसिद्धीप्रमुख चंदनगिरी तुलसीगिरी गोस्वामी (वय ५३) यांना ७५ हजारांचा गंडा घातला.

Online Cheating: Cybercrime gangster cheated BJP media chief in Nagpur | ऑनलाईन चिटिंग : नागपुरात भाजपा प्रसिद्धीप्रमुखाला सायबर गुन्हेगाराचा गंडा

ऑनलाईन चिटिंग : नागपुरात भाजपा प्रसिद्धीप्रमुखाला सायबर गुन्हेगाराचा गंडा

Next
ठळक मुद्देपाच रुपये भरायला लावले अन् ७५ हजार काढले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याची थाप मारून एका सायबर गुन्हेगाराने भाजपाचे शहर प्रसिद्धीप्रमुख चंदनगिरी तुलसीगिरी गोस्वामी (वय ५३) यांना ७५ हजारांचा गंडा घातला. त्याने मोबाईलवर एक अ‍ॅप पाठवून त्यात पाच रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पाच रुपये खात्यात जमा करताच ठगबाजाने गोस्वामी यांच्या खात्यातून ७४,५०० काढून घेतले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या बनवाबनवीप्रकरणी लकडगंज ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.
गोस्वामी छापरूनगरातील ब्रिजधाम कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांनी २०१६ मध्ये बजाज फायनान्सकडून ४ लाख ४० हजारांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी त्यांच्या खात्यात कंपनीने ४ लाख १५ हजार रुपयेच जमा केले. या कर्जाची त्यांनी मुदतीच्या आत व्याजासह परतफेड केली. मात्र, घेतलेल्या कर्जात आणि कंपनीने वसूल केलेल्या कर्जात २५ हजारांची तफावत आल्याचे लक्षात आल्याने गोस्वामी यांनी कंपनीकडे त्याबाबत विचारणा केली. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी २५ हजारांची रक्कम विद्या फी असल्याचे सांगितले. हा प्रकार न कळाल्यामुळे गोस्वामी यांनी ती फी नको असे म्हटले. त्यावर कंपनीकडून १० हजार रिकव्हरी पॉलिसी आणि १५ हजार प्रोसेसिंग फी असल्याचे सांगून पॉलिसीची रक्कम परत करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर आपली पॉलिसीची रक्कम मिळावी म्हणून गोस्वामी प्रयत्नशील होते. १२ सप्टेंबर २०१९ ला त्यांना ९९३३०८७५३१ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. आपण बजाज फायनान्स कंपनीतून वरिष्ठ अधिकारी समीर आशुतोष बिश्वास (रा. पश्चिम बंगाल) बोलतो, असे फोन करणाºयाने सांगितले. तुमच्या लोन पॉलिसीची रक्कम परत काढून देतो, अशी थाप मारून त्याने गोस्वामी यांनी एक अ‍ॅप (लिंक) पाठविली. ती डाऊनलोड करा, त्यानंतर त्या खात्यात केवळ ५ रुपये भरा, नंतर तुम्हाला तुमची रक्कम याच खात्यात वळती केली जाईल, असे सांगितले. गोस्वामी यांनी सरळपणे आपल्या मोर्बाइलवर ती अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात पाच रुपये ट्रान्सफर केले. पुढच्या पाच-दहा मिनिटातच टप्प्याटप्प्याने गोस्वामी यांच्या खात्यातून ७४,५०० रुपये काढून घेतल्याचे मेसेज त्यांना आले. गोस्वामी यांनी लगेच बँकेत धाव घेतली.
अधिकाऱ्यांनी गोस्वामी यांचे बँक खाते फ्रीज केले. त्यामुळे मोठी रक्कम वाचली. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार लकडगंज ठाण्यामार्फत सायबर शाखेत करण्यात आली. पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल तीन महिने चौकशी केली. त्यानंतर लकडगंज पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

विविध प्रांतात गेली रक्कम
गोस्वामी यांच्या खात्यातील काही रक्कम तेलंगणा, काही नोएडा तर काही रक्कम लखनौच्या व्यापारी प्रतिष्ठानातून पेटीएमच्या माध्यमातून आरोपीने खर्ची घातल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

 

Web Title: Online Cheating: Cybercrime gangster cheated BJP media chief in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.