कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील काँग्रेस आमदार केसी. वीरेंद्र यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने चल्लकेरे येथे छापा टाकला असून कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या छापेमारीदरम्यान २१.४३ किलो सोन्याची बिस्किटं, १०.९८५ किलो सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची बिस्किटं आणि सुमारे १ किलो सोन्याचे दागिने सापडले, ज्याची किंमत तब्बल २४ कोटी रुपये आहे. या प्रकरणात ईडीचा जप्तीचा आकडा आतापर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
या छापेमारीमध्ये ऑनलाईन बेटिंग वेबसाईट्समधून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कमाईचाही मोठा खुलासा झाला आहे. ईडीच्या तपासात असं समोर आलं आहे की, आमदार वीरेंद्र आणि त्यांचे सहकारी King567, Raja567, Lion567, Play567, Playwin567 सारख्या अनेक ऑनलाईन बेटिंग वेबसाईट चालवत होते. या साईट्सवरून गोळा केलेले पैसे पेमेंट गेटवे आणि म्यूल अकाउंट्सद्वारे दिले जात होते, जेणेकरून पैशाचा खरा सोर्स लपून राहतो.
ईडीला सापडलेल्या पुराव्यांवरून असं दिसून आलं आहे की, वीरेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने या काळ्या पैशातून कोट्यवधींचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास केला. इतकेच नाही तर त्यांनी मर्सिडीज-बेंझ, रेंज रोव्हर सारख्या महागड्या आणि लक्झरी गाड्याही खरेदी केल्या. मर्सिडीज-बेंझ एबीएच इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या नावावर सापडली, तर रेंज रोव्हर गुलशन खट्टर नावाच्या व्यक्तीच्या फंडमधून खरेदी केली गेली.
यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी ईडीने बंगळुरूच्या विशेष न्यायालयातून वीरेंद्र यांच्या कोठडीत आणखी ४ दिवसांची वाढ केली होती. बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगमधून कमावलेले पैसे मनी लाँड्रिंगद्वारे दिले गेले हे सिद्ध करणारे कागदपत्रं न्यायालयात सादर करण्यात आली होती. सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.