लखनौ पोलिसांनी एका मोठ्या सायबर क्राईमचा पर्दाफाश केला आहे आणि एका आंतरराज्यीय ऑनलाईन बेटिंग गँगच्या १६ जणांना अटक केली आहे. ही गँग 'लोटस गेमिंग साइट'द्वारे लोकांना ऑनलाईन बेटिंग करायला लावत असे आणि जमा केलेली रक्कम भाड्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करत असे. नंतर एटीएममधून पैसे काढत असे. पोलिसांनी आरोपींकडून एक कोटी रोख, ७९ एटीएम कार्ड, २२ पासबुक, १३ चेकबुक, ३० मोबाईल, तीन लॅपटॉप आणि दोन नोटा मोजण्याच्या मशीन्स जप्त केल्या आहेत.
तपासात असं दिसून आलं आहे की, आरोपींनी सर्वात आधी लोकांना त्यांच्या नावाने बँक खाती काढण्याचं आमिष दाखवलं, नंतर ही खाती भाड्याने घेतली आणि त्याचा वापर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला. आरोपींनी चौकशीदरम्यान उघड केलं की खेळाडूने ऑनलाईन बेटिंगसाठी पैसे जमा करताच ती रक्कम थेट भाड्याने घेतलेल्या खात्यात ट्रान्सफर केली जात असे. त्यानंतर एटीएममधून पैसे ताबडतोब काढले जात होते जेणेकरून खाती ब्लॉक होणार नाहीत.
१६ आरोपींना अटक
पोलिसांनी गुडंबा पोलीस स्टेशन परिसरातील स्मृती अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ४०३ वर छापा टाकला. येथून छत्तीसगड, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये प्रमोद साहू, साजिद अन्सारी, सोहेल अशरफ खान, गोविंद भाई प्रजापती, राकेश प्रल्हाद पटेल आणि अंश शर्मा इत्यादींचा समावेश आहे. अटक केलेल्या तरुणांच्या भाषेमुळे आणि कारवायांमुळे स्थानिक लोकांमध्ये संशय निर्माण झाला होता, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
विविध राज्यांमध्ये नेटवर्क
पोलीस आयुक्त अमरेंद्र सिंह म्हणाले की, या गँगने देशातील विविध राज्यांमध्ये नेटवर्क तयार केले होते. त्यांच्या संपर्कात अनेक लोक होते, जे काही पैशांच्या बदल्यात त्यांचे बँक खाते भाड्याने देण्यास तयार होते. पोलीस आता या बँक खातेधारकांचे आणि गेमिंग साइट ऑपरेटर्सचे मोबाइल नंबर ट्रेस करत आहेत, सायबर सेल डिजिटल व्यवहारांची चौकशी करत आहे. या प्रकरणात, पोलिसांचं म्हणणं आहे की तपासात आणखी मोठी नावं आणि दुवे समोर येऊ शकतात. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे.