एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला; भररस्त्यात घडलेल्या प्रकारानं पुणे हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 16:27 IST2022-02-05T16:25:59+5:302022-02-05T16:27:14+5:30
एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा दाबून चाकूने केले वार, नगर रोडवरील घटना, तरुणाला अटक

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला; भररस्त्यात घडलेल्या प्रकारानं पुणे हादरलं
पुणे : बोलत नाही, भेटत नाही याचा राग मनात धरुन एका तरुणाने १७ वर्षाच्या युवतीवर भर रस्त्यात गळा दाबून तिच्यावर चाकूने वार करण्याची धक्कादायक घटना चंदननगरमध्ये घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय २२, रा. बेंद्रे बिल्डींग, चंदननगर) याला अटक केली आहे. ही घटना चंदननगरमधील पुणे -नगर रोडवरील खुळेवाडीकडे जाणार्या रोडवर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चंदननगर येथे राहणार्या आहेत. आरोपी त्यांना ओळखतो. त्या आरोपीशी बोलत नाही. त्याला भेटत नाही, याचा राग होता. फिर्यादी या शुक्रवारी दुपारी पायी घरी जात असताना खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर निंबाळकर याने फिर्यादीला अडवले. आणि माझ्याबरोबर का बोलत नाही?, अशी विचारणा केली. युवतीने त्याला नकार दिल्यानंतर निंबाळकर चिडला. त्याने तिचा गळा दाबला. त्याच्याकडील चाकुने युवतीच्या पाठीवर, छातीवर, पोटावर व पायावर चाकूने सपासप वार केले. जखमी अवस्थेतील युवतीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन तपास करत आहेत