पनवेलमध्ये कोविशिल्ड लशीचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:38 IST2021-08-19T15:33:24+5:302021-08-19T15:38:08+5:30
Covishield vaccine : नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली होती.

पनवेलमध्ये कोविशिल्ड लशीचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून एकाला अटक
वैभव गायकर
पनवेल - मागील एक वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. शासकीय पातळीवर याबाबत उपाययोजना राबविल्या जात असताना सध्या सुरू असलेल्या लसीकरणात काळा बाजार करणारे समाजकंटक देखील सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळत आहेत. यापूर्वी रेमडिसिवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात समोर आला होता. त्याचप्रमाणे लसीकरणात देखील अशाचप्रकाराचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.
नवी मुंबईचे पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार किशोर कुमार खेत हा कामोठे येथील राजीव गांधी ब्रिज सेक्टर ८,नेरूळ नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सहा.पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक अजय माहुले यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून हा बोगस गि-हाईकास कोविशिल्ड लसीचे १५ डोस हे ऐकून ६० हजारात विक्री करीत असताना त्याला त्याब्यात घेतलं. त्याच्याकडील लसी जप्त करण्यात आल्या.
औषध निरीक्षक अजय माहुले यांच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी किशोर कुमार खेत (२१) हा बेरोजगार असून तो कामोठे सेक्टर 36 महादेव सोसायटीत वास्तव्यास आहे. तो मुळचा राजस्थानचा आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ०२ नवी मुंबई करीत आहे. सदर कारवाईत पो.उप.नि. रोंगे, पाटील, स.पो.उपनि. साळुंखे, पो.ह.अनिल पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, सुनील कुदले, संजय पाटील, इंद्रजित कानू, वाघ, काटकर, प्रफूल मोरे, गडगे, सूर्यवंशी, भोपी हे होते.