Crime News: सरकारी शिक्षकाकडे घबाड सापडले, बँकेच्या लॉकरमध्ये कोटीभर रुपये, चार सोन्याची बिस्किटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 22:12 IST2021-11-25T22:11:10+5:302021-11-25T22:12:39+5:30
Crime News Bihar: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मध्य विद्यालय भथहरमध्ये हा शिक्षक नोकरी करतो. नोकरीच्या आठ वर्षांत जमविलेली संपत्ती पाहून तेथील अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

Crime News: सरकारी शिक्षकाकडे घबाड सापडले, बँकेच्या लॉकरमध्ये कोटीभर रुपये, चार सोन्याची बिस्किटे
नालंदा : परदेशात काळा पैसा असल्याचे सांगितले जात असले तरी देशातच एवढा पैसा लपलेला आहे की त्यातून देशाची दोन-तीन बजेट होऊ शकतील. हे विधान जरी अतिशयोक्ती वाटत असली तरी अवघ्या आठ वर्षांपूर्वी शिक्षकाच्या नोकरीला लागलेल्या गुरुजींकडे सापडलेला पैसा, सोने पाहिले तर तुम्हाला विश्वास बसणार आहे. आयकर विभागाने बिहारच्या या धनाढ्य गुरुजींवर छापा टाकून घबाड ताब्यात घेतले आहे.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मध्य विद्यालय भथहरमध्ये हा शिक्षक नोकरी करतो. नीरज कुमार शर्मा असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याने नोकरीच्या आठ वर्षांत जमविलेली संपत्ती पाहून तेथील अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. पाटन्यातील बहादुरपूर एसबीआय शाखेत त्याच्या नावे लॉकर होते. या लॉकरमध्ये 1 कोटी कॅश, 250 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 विटा आणि अन्य कागदपत्रे मिळाली आहेत. ही एवढी रोख रक्कम कशी आली, सोने कसे खरेदी केले आदी कागदपत्रे त्याला सादर करता आलेली नाहीत. या शिक्षकाला एका महिन्याच्या आत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहेत.
यानंतर हादरलेल्या शिक्षकाने हा पैसा आपला नसल्याचे म्हटले आहे. हा पैसा त्याचा मावस भाऊ राजद आनंदचा आहे. त्याची कंस्ट्रक्शन कंपनी नवरचना आहे. या कंपनीत संचालक म्हणून आपण बिना वेतनावर असल्याचे म्हटले आहे. या संपत्तीचा मालक तोच आहे. एका महिन्याच्या आत यासंबंधीचे कागद आयकर विभागाला दिले जातील.