लॉकडाऊनमध्ये घरफोड्या करणाऱ्या एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:43 IST2020-04-15T20:41:45+5:302020-04-15T20:43:44+5:30
साथीदार फरार : घणसोली, कोपर खैरणे व खारघरचे गुन्हे उघड

लॉकडाऊनमध्ये घरफोड्या करणाऱ्या एकास अटक
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे दुकाने अनेक दिवस बंद असल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या एकाला कोपर खैरणे पोलिसांनीअटक केली आहे. त्याचा साथीदार फरार असून दोघांनी मिळून घणसोली, कोपर खैरणे तसेच खारघरमध्ये अनेक दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.
महेंद्र अविनाश पाटील (24) असे पोलिसांनीअटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर 19 मध्ये राहणारा आहे. मागील 3 दिवसात घणसोली, कोपर खैरणे तसेच खारघर परिसरात अनेक दुकानांचे शटर तोडून चोरी झाली आहे. त्यामध्ये बहुतांश औषध विक्रीची दुकाने आहेत. सध्या शहरात लॉकडाऊन असल्याने केवळ औषध विक्रेत्यांचा व्यवसाय सुरु आहे. यामुळे रात्रीच्या वेळी महेंद्र व त्याचा साथीदार अशा ठिकाणी घरफोडी करत होता. महेंद्रच्या दुचाकीवरून ते रात्रीच्या वेळी पोलिसांच्या नजरा चुकवत शहरात फिरायचे. यावेळी ज्याठिकाणी चोरीची संधी मिळेल तिथल्या दुकानाचे शटर वाकवून चोरी करायचे. त्यांनी बहुतांश गुन्हे पहाटेच्या वेळी केले आहेत. याप्रकरणी खारघर, रबाळे व कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर सर्व गुन्ह्यांमध्ये सुमारे 9 लाखाची रोकड व मुद्देमाल त्यांनी चोरला होता.