कापूस व्यापाऱ्याकडील दीड कोटी रुपये लुटले, धरणगावनजीक भर दुपारची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 16:50 IST2024-02-17T16:00:06+5:302024-02-17T16:50:58+5:30
पिंप्री ता. धरणगाव दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे जवळपास दीड कोटी रुपयांचे पेमेंट जळगावहून कारने नेले जात होते.

कापूस व्यापाऱ्याकडील दीड कोटी रुपये लुटले, धरणगावनजीक भर दुपारची घटना
- भगीरथ माळी
धरणगाव (जि. जळगाव) : कापूस व्यापाऱ्याची कार अडवून तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम तीन चोरट्यांनी लुटून नेली. ही खळबळजनक घटना धरणगावनजीक मुसळी फाट्याजवळ शनिवारी भरदुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली.
पिंप्री ता. धरणगाव दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे जवळपास दीड कोटी रुपयांचे पेमेंट जळगावहून कारने नेले जात होते. धरणगाव रोडवर उड्डाण पुलाखाली पैसे असलेली कार आली. त्याचवेळी समोरुन कारमधून आलेल्या तीन जणांनी ही कार अडवली आणि अवघ्या काही मिनिटात तब्बल दीड कोटी रुपये घेऊन पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.