महिला दिनीच नागपुरात गुंडागर्दीचा कहर... कॅबमध्ये बसलेल्या तरुणीला मारहाण
By योगेश पांडे | Updated: March 8, 2024 23:54 IST2024-03-08T23:53:45+5:302024-03-08T23:54:10+5:30
झीरो माइलजवळ मध्यरात्री घडला प्रकार : सीसीटीव्हींचे जाळे असूनही आरोपी फरारच

महिला दिनीच नागपुरात गुंडागर्दीचा कहर... कॅबमध्ये बसलेल्या तरुणीला मारहाण
नागपूर : उपराजधानीत हत्या व इतर गंभीर गुन्ह्यांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच आता गुंडागर्दीचा कहरदेखील समोर आला आहे. शहराच्याच नव्हे देशाचे केंद्रस्थान असलेल्या झीरो माइलजवळ मध्यरात्री कॅबमधून जाणाऱ्या एका तरुणीला महिलादिन सुरू झाल्यावर काहीच वेळात सात ते आठ गुंडांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर त्यांनी दोन ते तीन दिवसांतच तिचे अपहरण करण्याची देखील धमकी दिली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यानंतर पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
संबंधित तरुणी नागपुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या एका बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला मानकापूरला जायचे होते. तिने दक्षिण पश्चिम नागपुरातून कॅब बुक केली. कॅबचालक तिच्या घरी आला व तेथून ती कॅबमधूनच मानकापूरच्या दिशेने निघाली. झीरो माइल ते फ्रीडम पार्कदरम्यान अचानक कॅबमधील पेट्रोल संपले. कॅबचालकाने फोन करून त्याच्या एका मित्राला बोलावले. तरुणी कॅबमध्येच बसली होती. दोघेही मित्र पेट्रोल आणण्यासाठी संविधान चौकातील पेट्रोल पंपावर गेले. मात्र त्यांना पेट्रोल मिळाले नाही. त्यामुळे ते परत आले. त्याचवेळी राँगसाईडने तीन मोपेडवरून सात ते आठ तरुण तेथे पोहोचले. तरुणांपैकी एकाने थेट कॅबजवळ येऊन मुलीच्या गालावर झापड मारली. तर इतर तरुण तिला अश्लील शिवीगाळ करत होते.
कॅबचालक हिमांशू व सतीश यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील तरुणांनी बेदम मारहाण केली. एकाचे तर डोकेदेखील गाडीवर आदळले. त्यानंतर त्यांनी परत तरुणीकडे मोर्चा वळविला. या प्रकाराने तरुणी हादरली होती. आरोपींनी तिला दोन ते तीन दिवसांत तुझ्या घरून पळवून नेऊ अशी धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपी मोपेड्सवरून फरार झाले. एका कॅबचालकाने पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. सीताबर्डी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. अगोदर सर्वांना मेडिकल इस्पितळात नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींचा शोध कधी लागणार?
शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या भागात असा प्रकार झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनास्थळापासून काही अंतरावर परिमंडळ दोन उपायुक्तांचे कार्यालय आहे. संबंधित मार्गावर रात्रीदेखील वाहतूक सुरू असते. याशिवाय त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेदेखील आहेत. मात्र, त्यानंतरदेखील आरोपींचा सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता. कॅब कंपनीच्या नियमांप्रमाणे कॅबमधील पेट्रोलदेखील संपायला नको होते. मात्र, मध्यरात्री कॅब चालवत असताना कॅबचालकाने या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.