लग्नाच्या दिवशीच प्रियकराने दिला नकार; तरुणीची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:56 IST2023-05-06T12:56:28+5:302023-05-06T12:56:38+5:30

वडाळा येथील घटना, तो रोज तिला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे

On the day of the wedding, the lover refused to marry; The girl ran to the police | लग्नाच्या दिवशीच प्रियकराने दिला नकार; तरुणीची पोलिसांत धाव

लग्नाच्या दिवशीच प्रियकराने दिला नकार; तरुणीची पोलिसांत धाव

मुंबई -  सायन परिसरात राहणाऱ्या तरुणीची फेसबुकवरून एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तिने त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. लग्नाची तारीखही ठरली. मात्र, लग्नाच्या तारखेलाच प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

सायन परिसरात तक्रारदार २५ वर्षीय तरुणी आजीसोबत राहते. २०१९ मध्ये तिची आसिफ नावाच्या तरुणासोबत फेसबुकवरून ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. त्याने तिला प्रेमाची गळ घातली. तरुणीनेही त्याला होकार दिला. दोघेही वडाळ्यात भेटले. त्यांच्यात गप्पा रंगल्या. भेटी वाढल्या. त्यानंतर मात्र आसिफने तिला लग्नाची मागणी घातली. 

तो रोज तिला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे. त्यांच्यात जवळीक वाढली. दोघांमध्ये चार वर्षे चांगले प्रेमसंबंध होते. त्यानंतर मात्र जानेवारी २०२३ मध्ये तरुणीला शिवसेना कार्यालयात नोकरी मिळाली. त्यानंतर आसिफ तिला टाळू लागला. लग्नासाठीही नकार कळवला. नेमके काय झाले, या प्रकाराने तरुणीही गोंधळली. तिने त्याला मनवत लग्नाबद्दल घरी बोलण्यास सांगितले. त्यावर त्याने मला थोडा वेळ हवा आहे. योग्य वेळ आल्यावर बोलतो, असे तिला सांगितले. मात्र, दोघांमधील वाद वाढू लागले.

आसिफच्या वडिलांशी बोलणे झाल्यानंतर तो लग्नाला तयार झाला. न्यायालयात जाऊन त्यांनी लग्नासाठी १ मे तारीखही घेतली. ठरल्याप्रमाणे लग्नाचे स्वप्न रंगवत असताना १ मे रोजी आसिफ लग्नासाठी नकार कळवत ‘नॉट रिचेबल’ झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. दरम्यान, आरोपीला लवकरच पकडू अशी माहिती पोलिसांनी दिली असून त्यासाठी खास पथके नेमलेली आहेत.

Web Title: On the day of the wedding, the lover refused to marry; The girl ran to the police

टॅग्स :marriageलग्न