वृद्धाला गमवावी लागली कोटयवधीची जमापूंजी; सायबर पोलिसांकड़ून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:30 IST2021-09-03T22:27:22+5:302021-09-03T22:30:42+5:30
Cyber Case : याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धाला गमवावी लागली कोटयवधीची जमापूंजी; सायबर पोलिसांकड़ून गुन्हा दाखल
मुंबई : निवृत्तीनंतरच्या विमा योजनेच्या नावाखाली ट्रॉम्बेतील ६० वर्षीय वृद्धाला सव्वा कोटी रुपये गमवावे लागले आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॉम्बे परिसरात राहणारे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मे महिन्यात अंजली वर्मा नावाच्या महिलेने कॉल करून सरकारी अधिकारी असल्याचे भासवले. पुढे निवृत्ती नंतरच्या पॉलिसीबाबत माहिती देत बोलण्यात गुंतविले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी संबंधित पॉलिसीबाबत होकार दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावज जाळयात अडकताच वर्माने तक्रारदार यांना प्रोसेसिंग फी, नोंदणी फी सह विविध चार्जेसच्या नावाखाली काही रक्कम भरण्यास सांगितली. याच ३ महिन्यात वर्मा यांच्याकड़ून १ कोटी १४ लाख रुपये उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी व्यवहार थांबवला.
सोमवारी पूर्व प्रादेशिक सायबर विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नुकताच गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. सध्या आरोपीच्या मोबाईल क्रमांक आणि बँक तपशिलाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करत आहेत. तसेच संबंधित खात्यातील रक्कम गोठविण्याबाबतही बँकेला सांगण्यात आले आहे.