"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 15:05 IST2025-10-26T15:00:20+5:302025-10-26T15:05:23+5:30
एका २४ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा येथील हॉस्टेलमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतदेह आढळला.

फोटो - ndtv.in
ओडिशातील एका २४ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा येथील हॉस्टेलमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतदेह आढळला. गंजम जिल्ह्यातील जराडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अभयपूर येथील रहिवासी रोशन कुमार पात्रो नीट-यूजी परीक्षेची तयारी करत होता. तो राजीव गांधी नगर येथील हॉस्टेलमध्ये त्याचा चुलत भाऊ आणि मित्रांसोबत राहत होता.
एनडीटीव्हीशी संवाद साधताना रोशनचे वडील राधाश्याम पात्रो म्हणाले, "काल रात्री आम्ही आमच्या मुलाशी बोललो तेव्हा तो खूप आनंदी होता. तो ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे आमच्याशी तब्बल ४० मिनिटं बोलला. माझ्या मेहुण्याच्या मुलाने आम्हाला सांगितलं की, जेव्हा रोशनच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा त्याचा मृतदेह बेडवर रक्ताने माखलेला आणि निर्वस्त्र आढळला."
पात्रो म्हणाले, "मला खात्री आहे की, माझ्या मुलाने आत्महत्या केलेली नाही. तुम्हाला सत्य कळेल. माझा एकुलता एक मुलगा नेहमीच खूपच हूशार होता. मी त्याला कोटा येथील डॉक्टरकडे सोडलं होतं आणि आता मी त्याचा मृतदेह आणायला जात आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार आणि त्याचे मित्र रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते, परंतु सकाळी जेव्हा त्याने दार उघडले नाही तेव्हा त्याच्या मित्रांना वाटलं की, तो झोपला असेल. जेव्हा तो दुपारीही जेवणासाठी बाहेर आला नाही तेव्हा त्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वॉर्डनला माहिती दिली.
वॉर्डनने डुप्लिकेट चावीने दार उघडलं आणि खोलीत प्रवेश केल्यावर कुमार बेडवर तोंडावर पडलेला आढळला. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कुमारला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. स्थानिक पोलीस त्याच्या मृत्यूचं कारण तपासत आहेत.