अरे देवा! पैशासाठी 24 वर्षीय तरुण बनला नक्षलवादी; स्वतःच्याच वडिलांना पाठवले धमकीचे पत्र, पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:22 IST2025-10-16T15:21:06+5:302025-10-16T15:22:18+5:30
Odisha Crime: तरुणाचे कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

अरे देवा! पैशासाठी 24 वर्षीय तरुण बनला नक्षलवादी; स्वतःच्याच वडिलांना पाठवले धमकीचे पत्र, पुढे...
Odisha Crime: पैशाच्या लालसा माणसाला काय करायला लावेल, काही सांगता येत नाही. पैशांच्या लालसेपोटी मुलानं आई-वडीलांना धमकावल्याच्या, मारहाण केल्याच्या किंवा हत्येच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना ओडिशातून समोर आली आहे. पैशांसाठी एक मुलगा चक्क नक्षल बनला आणि आपल्याच वडिलांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र पाठवलं.
सविस्तर घटना अशी की, कालाहांडी जिल्ह्यातील रुपारोड परिसरात राहणारा दिनेश अग्रवाल यांना कारमध्ये ६ ऑक्टोबर रोजी एक पत्र सापडले. त्या पत्रावर एका नक्षली संघटनेचे नाव लिहिलेले होते आणि ३५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसन न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला मारू, अशी धमकीही देण्यात आली. वडिलांना विश्वास बसावा म्हणून मुलाने वडिलांच्या एका मित्रालाही अशाच प्रकारचं पत्र पाठवलं.
पत्र वाचताच दिनेश अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी हे नक्षलवाद्यांचं खरं धमकीपत्र समजून तातडीनं नर्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तपास सुरू केला. या भागात नक्षलवादी हालचाली आधीही झाल्याने पोलिसांनी सुरुवातीला याला गंभीर धोका मानला. परंतु चौकशी जसजशी पुढे गेली, तसतसं चित्र स्पष्ट झालं. संशयावरुन एका तरुणाला ताब्यात घेतलं, त्यानं आरोप कबूल केला.
तो तरुण दुसरा कोणी नसून, तक्रारदार दिनेश अग्रवाल यांचा स्वतःचा मुलगा अंकुश अग्रवाल होता. पोलिसांच्या मते, हा कौटुंबिक आर्थिक वाद असला तरी, यात नक्षली संघटनेचं नाव वापरुन धमकी देणं गंभीर गुन्हा मानला जाईल. सध्या पोलिस तपास करत आहेत की, ही योजना अंकुशनं एकट्यानं आखली होती की, कुणाच्या सल्ल्यानं आखली. दरम्यान, पैसे उकळण्यासाठी मुलानं स्वतःच्याच बापाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.