चिमुरडीशी अश्लील चाळे, जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण
By प्रशांत माने | Updated: December 22, 2024 18:30 IST2024-12-22T18:29:17+5:302024-12-22T18:30:18+5:30
कल्याण पूर्वेतील घटना; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चिमुरडीशी अश्लील चाळे, जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण
कल्याण : आपल्या ९ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला आरोपीने पत्नीसह मारहाण केल्याचा प्रकार कल्याण पूर्वेकडील भागात घडला. याप्रकरणी आरोपी उत्तम पांडे (वय ४६ ) आणि त्याची पत्नी रिना (वय ४०) या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत तसेच मारहाणीचा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. महत्वाचे म्हणजे मारहाण झालेले पिडीत मुलीचे वडील मुंबईत पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
पिडीत अल्पवयीन मुलगी शनिवारी १० सुमारास तीच्या मैत्रिणीसह खेळत होती. आरोपी पांडे याने तिला जबरदस्तीने घरात ओढून घेतले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने घडलेला प्रकार घरी जाऊन आई वडीलांना सांगितला. याचा जाब पांडे ला विचारण्यासाठी संबंधित कुटुंब गेले असता पांडे आणि त्याच्या पत्नीने कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा मारहाणीचा घडलेला प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
पिडीत मुलीचे वडील जखमी झाले आहेत. दरम्यान पिडीत मुलीच्या आईने मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पांडे पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अदयाप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कल्याण पश्चिमेतील अखिलेश शुक्ला याने मराठी कुटुंबाला गुंड आणुन मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुर्वेकडील भागात घडलेली घटना पाहता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.